मुख्य सामग्रीवर वगळा

शांगरी-ला-डायलॉग : आशिया - प्रशांत क्षेत्रासाठी आवश्यक असलेली संरक्षण परिषद!

 शांगरी ला डायलॉग, हे वर वर नाव पाहताना आपल्या पटकन लक्षात येणार नाही, आपण म्हणू हे असं काय नाव आहे. पण शांगरी ला डायलॉग/परिषद ही आंतरराष्ट्रीय स्तरावर आशिया- प्रशांत क्षेत्रासाठी म्हणजे प्रशांत महासागर क्षेत्रातल्या देशांसाठीची म्हणून एक संरक्षण परिषद आहे. ही  परिषद २००२ पासून वर्षातून एकदा नित्य नेमाने भरवली जाते. शांगरी ला नावामागे आणि ती भरवण्यामागे रंजक गोष्ट आहे. सर्वप्रथम इथे हे नमूद केले पाहिजे की ब्रिटन स्थित असलेला एक स्वतंत्र थिंक टॅंक “इंटरनॅशनल इंस्टिट्यूट फॉर स्ट्रटेजिक स्टडीज” (IISS)  हा शांगरी ला परिषदेचा मुख्य आयोजक आहे.

जगामध्ये फार कमी अश्या संस्था आहेत की ज्या संरक्षण क्षेत्राशी निगडीत अश्या प्रकारे संरक्षण परिषद भरवतात. सर जॉन चिपमन हे IISS चे सद्य डायरेक्टर जनरल... २००१ साली सर चिपमन यांच्या मनात एक विचार आला की अमेरिका आणि युरोप साठी त्यांच्या त्यांच्या संरक्षण परिषदा आहेत. पण आशिया – प्रशांत क्षेत्रासाठी आणि खासकरून आशियासाठी एकही संरक्षण परिषद नाही, जी आशियातल्या देशांचे त्यांच्या सुरक्षा प्रश्नांवर चर्चा करून त्यावर तोडगा काढू शकेल. अर्थात दर वेळेस प्रश्न आहेच आणि ते सोडवायचे असा जरी हेतु नसला तरीसुद्धा दोन देशांनी द्विपक्षीय संवाद साधून किंवा बहुपक्षीय स्तरावर चर्चा करून एखाद्या सुरक्षा विषयावर आपापली मतं नोंदवून प्रसंगी अनौपचारिक पद्धतीने चर्चा घडवून आणणे हे सोयीस्कर आहे. दोन देशांमधल्या सरकारांनी ज्याला ‘ट्रॅक वन’ डिप्लोमसी म्हणता येईल अश्या पद्धतीने संवाद साधणे ते ही कुठलाही प्रकारचं बंधन नाही, कुठलीही औपचारिक पत्रकार परिषद घेण्याची सक्ती नाही आणि कुठलही स्टेटमेंट जारी करण्याची योजना नाही अश्या हलक्या फुलक्या वातावरणात चर्चा शांगरी ला डायलॉग मध्ये व्हायला पाहिजे अश्या स्वरूपात त्याचा आराखडा बनवण्यात आला.

सर चिपमन यांच्या पुढाकाराने आशिया प्रशांत क्षेत्रातल्या देशाना एक हक्काचं, संरक्षण क्षेत्राशी निगडीत एक व्यासपीठ हवच, जिथे अनौपचारिक पद्धतीने चर्चेतून मार्ग निघेल... असं ठरवण्यात आलं. त्यासाठी सिंगापूर या देशाची पहिल्या आणि सुरवातीच्या परिषदेसाठी निवड करण्यात आली. बरं परिषदेसाठी चांगलं ठिकाण आवश्यक होतं... कारण वेगवेगळ्या देशातील संरक्षण मंत्री, तसंच विविध देशांच्या सैन्य दलांचे प्रमुख तसंच इतर अधिकारी हे परिषदेसाठी येणार. हे लक्ष्यात   घेऊन सिंगापूर मधल्या पंचतारांकित अशा शांगरी ला हॉटेलची निवड करण्यात आली. आणि अश्या या शांगरी ला हॉटेलमध्ये ही परिषद भरणार म्हणून तिला “शांगरी ला डायलॉग” म्हणजे शांगरी ला परिषद असं संबोधण्यात आलं.

शांगरी ला परिषदेसाठी चिपमन हे २००१ साली सिंगापूरच्या राष्ट्रपतीना भेटले. त्यावर राष्ट्रपति नेथन यांनी शांगरी ला परिषदेसाठी सर्व मदत करण्याचं मान्य केलं. तसंच स्थळ ठरवलं आणि IISS ने स्वतंत्रपणे परिषद भरवे पर्यन्त सिंगापूर सरकार मदत करेल असं आश्वासनसुद्धा दिलं. हा आहे शांगरी ला परिषद स्थापन होण्यामागचा इतिहास. आता थोडं वर्तमानबद्दल बोलायचं म्हणजे यावर्षी १० ते १२ जून २०२२ हे तीन दिवस ही परिषद संपन्न झाली. या परिषदेला चाळीस देशातले जवळपास ५०० च्या वर डेलिगेट्स एकत्र जमले होते. २०१९ आणि २०२० ला कोविड १९ मुळे परिषद भरवण्यात आली नव्हती.

आशियातल्या महत्वाच्या अश्या सुरक्षा प्रश्नांवर चर्चा होणं या डायलॉग मध्ये अपेक्षित आहे. शांगरी ला चं अधिकृत नाव म्हणजे “एशिया सिक्युरिटी समेट” होय. ज्या गोष्टी इतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर होऊ शकत नसतील किंवा ते शक्य नसेल त्याबद्दल शांगरी ला डायलॉग मध्ये बंद दरवाज्यांमागे विस्तृत चर्चा होऊ शकते इतकं या डायलॉग चं महत्व आहे. या वर्षी दोन महत्वाचे विषय डायलॉगमध्ये चर्चिले गेले. ते म्हणजे रशिया- युक्रेन युद्ध आणि दूसरा विषय हा अर्थातच चीन आणि एकूणच अमेरिका –चीन संबंधाचा होता. या प्रसंगी यूक्रेनचे अध्यक्ष झेलेनस्की हे व्हिडिओ माध्यमाद्वारे सहभागी झाले होते आणि त्यांनी जमलेल्या डेलिगेट्स समोर भाषण केलं. या प्रसंगी चीनचे संरक्षण मंत्री जनरल फेंग आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव जनरल ऑस्टिन यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी चीनने तैवान प्रसंगी अमेरिकेला इशारा दिला.

शांगरी ला डायलॉगमध्ये चीनचा वरचष्मा दिसत होता आणि हे चित्र स्पष्ट दिसत होतं. जनरल फेंग यांनी आम्ही भारताबरोबर ‘लाइन ऑफ अकच्युअल कंट्रोल’ वर चांगले संबंध आणि शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्याच्या मताचे आहोत अशी प्रतिक्रिया दिली.

शेवटी विविध देशांचे संरक्षण मंत्री आणि सैन्य दलांचे प्रमुख जर शांगरी ला डायलॉग मध्ये डिप्लोमसिदवारे प्रश्न सोडवत असतील तर कित्येक युद्ध टाळली जाऊ शकतात. म्हणून इथे हे म्हणणं उचित ठरेल की आशिया प्रशांत भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी या क्षेत्रातल्या देशाना इथे चर्चा करणे ही एक चांगली संधि आहे. शेवटी या संधीचा फायदा करून घेणं हे या देशांच्याच हिताचं आहे.

 

-निखिल कासखेडीकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

  ‘ टोंगा ’ हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया , मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. या राज्यावर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती , १९७० पर्यन्त... त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला ... हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण विशेष असं सांगण्यासारखं १५ जानेवारी २०२२ पर्यन्त असं काही नव्हतं. पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या ‘ हुंगा टोंगा हुंगा हापाई ’ या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला टोंगा हे नाव माहीत झालं. या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं , असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली... पाण्याने प्रदेश व्य...

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्...