मुख्य सामग्रीवर वगळा

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजे जणू विज्ञानाचा आविष्कार!

 माणूस प्राण्याने आज वेगवेगळे शोध लावून अनेक क्षेत्रात मग ते कुठलही क्षेत्र असो बरीच प्रगती केली आहे. यामध्ये अंतर्भाव होतो तो विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र आणि अश्या असंख्य क्षेत्रांचा... वेगवेगळ्या ऐतिहासिक टप्प्यांवर अनेक शोध लागल्यानंतर माणूस प्राण्याने जीवनमान सुधारले. मग तो प्राचीन काळातला आगीचा शोध असो, चाकाचा शोध किंवा अगदीं आतापर्यंतचा एकविसाव्या शतकातला इंटरनेटचा शोध असो, अन्यथा डि एन ए हा शोध असो, किंवा मग आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शोध असो. सध्याचा काळ आहे हा अंतराळ युगाचा आहे. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अमेरिकेसारख्या महासत्तेने स्वतची अशी ‘स्पेस फोर्स’ उभी केली आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या काळात एक स्पेस कमांड असावी आणि त्यावर काम व्हावं अशी संकल्पना पुढे आली. अमेरिकेला अंतराळ क्षेत्रातला भरपूर अनुभव पाठीशी आहे. आपण अंतराळ युगाकडे आता वाटचाल करत आहोत, असंसुद्धा म्हणायची वेळ आली आहे. आज अमेरिकेची ‘नासा’ (अंतराळ संस्था) जगात एक शक्तिशाली संस्था म्हणून नावारूपाला आली. शिवाय रशियाची अंतराळ संस्था ‘रोसकोसमोस’ सुद्धा ‘६० च्या दशकापासून कार्यरत आहे. अमेरिका, रशिया आणि युरोपीय अवकाश संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची कल्पना पुढे आली. इथे हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे नुकतच रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाने हे अंतराळ स्थानक अमेरिकेच्या हटवादी भूमिकेमुळे पृथ्वीवर पडू शकतं असं विधान केलं आहे. म्हणून हे अंतराळ स्थानक आहे तरी काय चीज! हे इथे लक्षात घ्यायला पाहिजे.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक १९९८ साली अमेरिका, रशिया आणि इतर युरोपीय देशांच्या मदतीने एक अंतराळातला संयुक्त प्रकल्प म्हणून प्रक्षेपित केलं गेलं. अमेरिकन फुटबॉल स्टेडियमच्या आकाराएव्हढ हे स्थानक मोठं आहे. त्याची लांबी आहे ३५७ फुट इतकी. या स्थानकाचं वजन आहे ४१९,७२५ किलोग्राम इतकं. या स्थानकावर आतापर्यन्त जगातल्या जवळपास १९ देशांच्या २४० व्यक्तिनी या स्थानकला भेट दिली आहे. तसंच या स्थानकावर जगातल्या कुठल्याही भागातून ६ तासात पोहोचता येतं. जे वैज्ञानिक प्रयोग पृथ्वीवर करता येत नाहीत असे प्रयोग या अंतराळ स्थानकावर करण शक्य झालं आहे. या स्थानकात एकावेळेस ६ क्रू मेंबर्स राहू शकतात. सगळ्यात गमतीशीर भाग म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून अंतराळ स्थानक अवकाशात ३५० किलोमीटर उंचीवर आहे. हे स्थानक पृथ्वीभोवती २८,००० किलोमीटर प्रती तासाने परिभ्रमण करत आहे. साधारण २४ तासांमध्ये १६ वेळा हे स्थानक पृथ्वीभोवती भ्रमण करत आहे. म्हणजे या स्थानकात जो अंतराळवीर असेल त्याला १६ वेळा सूर्योदय दिसेल आणि १६ वेळा सूर्यास्त दिसेल. याचबरोबर या स्थानकाचं वैशिष्ट्य म्हणजे अंदाजे ३००० संशोधनं या स्थानकावर केली गेली आहेत. मग त्यात जीवशास्त्र, खगोलशास्त्र, मानवी संशोधन, तंत्रज्ञान आणि भौतिकशास्त्र यांचा समावेश आहे. अजून एक गमतीशीर भाग म्हणजे अंतराळ स्थानकात पृथ्वीसारखं गुरुत्वाकर्षण नाही, तिथे मायक्रोग्रॅव्हिटी आहे. अंतराळवीरांची तब्येत चांगली राहावी यासाठी त्यांना एका दिवसातून २ तास व्यायाम करावाच लागतो.

खरं म्हणजे इतकी सगळी माहिती वाचून आपण दमलो असू, तर जी व्यक्ति प्रत्यक्ष अंतराळवीर म्हणून अंतराळ स्थानकात काम करत असेल, त्यांना काय वाटत असेल याची आपण फक्त कल्पना करू शकतो.

अमेरिकेने रशिया युक्रेन युद्धाच्या दरम्यान निर्बंध लादले आहेत, आणि म्हणून त्याचा फटका रशियन कंपन्याना बसतो आहे. या दरम्यान रशियाकडून हे अंतराळ स्थानक पाडण्याच्या पर्यायामुळे जगामध्ये एकच खळबळ माजली आहे. नासाकडून हे स्थानक २०३१ मध्ये बंद करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे. आता तर परिस्थिती अशी आहे की अमेरिका, रशिया आणि चीन हे आपापले इंटरेस्ट जपण्यासाठी स्वतःचं असं एक अंतराळ स्थानक बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. (चीनला यात यश मिळालं नाही.)

आपण अंतराळ युगात प्रवेश केला आहे. भारताची (इस्रो) अंतराळ संस्थासुद्धा अंतराळ क्षेत्रात चांगली कामगिरी बजावत आहे... कमी खर्चात उत्तम दर्जाचे उपग्रह सोडण्यासाठी म्हणून इस्रोचं नाव आज जगात घेतलं जात आहे. भविष्यात इस्रो अमेरिकेप्रमाणे अंतराळ स्थानक तयार करणार का! हा प्रश्न यानिमित्ताने विचारलं जाऊ शकतो.

एक मात्र नक्की एकविसाव्या शतकात अशी अंतराळ स्थानकं म्हणजे मानव जातीसाठी वरदान ठरू शकतात, म्हणूनच हा विज्ञानाचा अविष्कारच आहे, असं आपण म्हणू शकतो.


- निखिल कासखेडीकर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

  ‘ टोंगा ’ हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया , मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. या राज्यावर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती , १९७० पर्यन्त... त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला ... हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण विशेष असं सांगण्यासारखं १५ जानेवारी २०२२ पर्यन्त असं काही नव्हतं. पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या ‘ हुंगा टोंगा हुंगा हापाई ’ या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला टोंगा हे नाव माहीत झालं. या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं , असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली... पाण्याने प्रदेश व्य...

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

आधुनिक व्यापारातील संकल्पना -

  मुक्त व्यापार. व्यापारातील संरक्षणाच्या पद्धतीच्या बरोबर विरुद्ध प्रकार म्हणजे मुक्त व्यापार. आणि हो आज मुक्त व्यापाराचा सगळीकडे बोलबाला आहे. अनेक अभ्यासक, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक तसेच अनेक तज्ञ लोकांनी या मुक्त व्यापार संकल्पनेला संमती दर्शवली आहे. या मुक्त व्यापार संकल्पनेचा अनेकांनी उहापोह केला आहे, आणि सगळ्याचं एकमत असं झालं कि हीच व्यापार पद्धती सर्वसमावेशक आणि सर्व देशांच्या हिताची आहे. एवढच काय तर जागतिक व्यापार संघटना या मुक्त व्यापार संकल्पनेला बांधील आहे. त्यांच्या अजेन्ड्यामध्ये दोन किंवा अधिक देशांचा एकमेकांशी मुक्त व्यापार ह्या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे. एक गोष्ट मान्य करायला पाहिजे कि आज जगात मुक्त व्यापारचे समर्थक मोठ्या संखेने आहेत, त्याच्या तुलनेत व्यापाराला संरक्षण द्या असे म्हणणारे खूप कमी आहेत. खरं असं म्हणायला काहीच हरकत नाही कि मुक्त व्यापारावर सगळ्याचं एकमत आहे. मुक्त व्यापाराची काही खास अशी वैशिष्टे आहेत. व्यापारातील संरक्षण या संकल्पनेत ज्या काही गोष्टींचा अंतर्भाव केला आहे अगदी त्याच्या सगळ्या उलट गोष्टींचा स्वीकार मुक्त व्यापारात केला आहे. उदाह...