मुख्य सामग्रीवर वगळा

ब्रिटनमधल्या निवडणुका आणि मार्गारेट थॅचर!

 ब्रिटन... ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला, खुद्द अमेरिकेलाही एकेकाळी वसाहत बनवणारा आणि भारतासारख्या देशावर तीनशे वर्ष अनभिषिक्त राज्य करणारा एक चतुर देश. ज्या देशाकडून जगाने राजकारणाचे धडे गिरवले... असा हा ब्रिटन! ज्या देशाकडून लोकशाही मूल्य आणि लोकशाही राज्यव्यवस्था इतर देशांमध्ये प्रवाहित झाली... असा हा ब्रिटन! तसा ब्रिटन हा राजेशाही व्यवस्था मानणारा देश. या राजेशाहीत राणीच्या हातात संवैधानिक सत्ता! हे जरी सगळं खरं असलं तरीसुद्धा ब्रिटनच्या राजकारणामद्धे एका महिलेला पंतप्रधानपद मिळायला १९७९ साल उजाडावं लागलं. आधुनिक काळात, ब्रिटनमध्ये द्विपक्षीय राज्यव्यवस्था अस्तित्वात आली. यातले  दोन प्रमुख पक्ष म्हणजे कंझरवेटिव्ह पक्ष आणि लेबर पक्ष! अन्य बाकीचे छोटे पक्ष आहेत पण त्यांचं अस्तित्व नगण्य आहे. तर ब्रिटनमध्ये तीनदा निवडुन येऊन सरकार चालवण्याचा आणि पहिली महिला म्हणून पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा मान ‘मार्गारेट थॅचर’ यांना जातो. थॅचर यांनी १९७९ ते १९९० असं एकूण ११ वर्ष ब्रिटनचं पंतप्रधानपद भूषवलं. इतिहासात आजच्या दिवशी म्हणजे ९ जून १९८३ ला थॅचर दुसऱ्यांदा घवघवीत यश मिळवून निवडून आल्या.  

असं म्हटलं जातं की थॅचर पंतप्रधान असताना अॅडम स्मिथ या अर्थशास्त्राच्या पितामहाने १७७६ साली लिहिलेलं ‘वेल्थ ऑफ नेशन्स’ हे आद्य पुस्तक त्या त्यांच्या बॅगमध्ये रोज ठेवायच्या आणि प्रसंगी बाहेर असतानासुद्धा त्या स्वतःजवळ बाळगायच्या इतका त्या पुस्तकाचा प्रभाव थॅचर यांच्यावर होता. त्यांनी नेहमी उदारमतवादी आर्थिक धोरणांचा पुरस्कार केला. यालाच पुढे ‘थॅचरिजम’ असं जग म्हणायला लागलं. थॅचर पहिल्यांदा ब्रिटनच्या पंतप्रधान बनल्या ते साल होतं १९७९... त्यांचा पंतप्रधान म्हणून पहिला कार्यकाळ होता तो १९७९ ते १९८३ असा. या काळात ब्रिटनमध्ये चलनवाढ मोठ्या प्रमाणावर झाली होती तसंच बेरोजगारी वाढली होती आणि आर्थिक मंदीसुद्धा आली होती. थॅचर यांचा कल हा प्रत्यक्ष करांपेक्षा अप्रत्यक्ष कर वाढवण्याकडे होता. बेरोजगारीने तीस लाखाचा टप्पा पार केला होता. १९७९ ते १९८१ काळात ब्रिटनमध्ये मंदी आली होती. थॅचर यांनी सुरवातीच्या पंतप्रधान पदाच्या काळात संरक्षण खर्च कमी केला होता. त्यासाठी बजेटमध्ये संरक्षण क्षेत्रासाठी तरतुदी कमी केल्या.

कालांतराने सगळ्या आघाड्यांवर थॅचर यशस्वी होत होत्या, १९८१ नंतर ब्रिटनची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत होती. पण दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून त्या दोन गोष्टींमुळे निवडून आल्या. एक तर अर्थव्यवस्था सकारात्मक होत होती... हे आर्थिक यश एका बाजूला होतं. पण सगळ्यात महत्वाचा घटक थॅचर यांना पुन्हा निवडून देण्यामधला जर असेल तर तो होता ‘फॉकलंड युद्ध’ जिंकण्याचा. २ एप्रिल १९८२ ला अर्जेंटिनाने फॉकलंड बेटांवर हल्ला चढवला. सुरवातीला थॅचर यांनी ही गोष्ट फार मनावर घेतली नाही. फॉकलंड बेटांचा विषय हा अर्जेंटिना आणि ब्रिटन यांच्या मधला वादाचा विषय होता. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रिगन यांनी अमेरिकेचा ब्रिटनला पाठिंबा आहे असं सांगितलं. त्वरित हा विषय संयुक्त राष्ट्रांकडे गेला. फ्रांस आणि मित्र राष्ट्रानी ब्रिटनला मदत देऊ केली. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनं अर्जेंटिनाला दोषी धरलं. थॅचर यांनी घाई करून ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री बदलले आणि नेव्हल टास्क फोर्स तयार करून केवळ तीन दिवसाच्या आत युद्ध संपलं पाहिजे आणि फॉकलंड बेटं आपल्याला मिळाली पाहिजे असं जणू फर्मानच काढलं.

ब्रिटनच्या नौसेनेनं आक्रमक पवित्रा घेत हल्लाबोल केला. सुरवातीला अमेरिकेने अर्जेंटिना आणि ब्रिटन यांच्यामध्ये मध्यस्थी करून पाहिली, पण अर्जेंटिनाने अमेरिकेचा प्रस्ताव फेटाळला. इकडे ब्रिटनमध्ये दोन्ही पक्षानी थॅचर याना पाठिंबा दर्शवला. झालं... ब्रिटिश नौसेनेनं अर्जेंटिनाची ‘जनरल बेलग्रानो’ ही युद्धनौका बुडवली. त्यामुळे ब्रिटिश हल्ला तीव्र होतो आहे असं लक्षात आल्यानंतर अरजेनटाईन सैन्य मागे सरले. या युद्धात युरोप ब्रिटनच्या बाजूने होता तर लॅटिन अमेरिका हा अर्जेंटिनाच्या बाजूने होता. अर्जेंटिनाच्या वायु दलाने ब्रिटिश सैन्यदलासमोर आव्हान उभं केलं आणि कडवी झुंज दिली. सगळ्या आघाड्यांवर अपयश येत आहे असं समजताच अर्जेंटिनाचा जनरल मेंडोसा याने शेवटी शस्त्र खाली ठेवायचा निर्णय घेतला आणि ब्रिटनला अर्जेंटिना शरण आला. ती तारीख होती, १४ जून १९८२!  एकूण ७४ दिवस हे युद्ध चाललं. युद्धात अर्जेंटिनाचे ६४९ सैनिक मारले गेले तर इकडे ब्रिटनच्या २५५ सैनिकानी आपले प्राण गमावले. अर्जेंटिनाकडे कालबाह्य झालेले सैनिकी तंत्रज्ञान होते तर ब्रिटनकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान होतं या एका फरकाने सगळ्या युद्धाचे फासे फिरले. शिवाय ब्रिटनला जगातून मिळणारा पाठिंबा बराच होता.  

१९८३ च्या सर्वसाधारण निवडणुकांमध्ये ब्रिटनची बदललेली आर्थिक स्थिति आणि फॉकलंड युद्धातला विजय या दोन बाबींमुळे मार्गारेट थॅचर पुन्हा दुसऱ्यांदा पंतप्रधान बनल्या. त्यांची लोकप्रियता वाढली. ब्रिटिश जनतेमध्ये थॅचर हीरो बनल्या. लोकानी उस्फूर्तपणे त्यांना पाठिंबा दिला. हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये ६५० जागांपैकी ३९७ जागांवर थॅचर यांच्या कंझरवेटिव्ह पक्षाने घवघवीत यश संपादन केलं. तसंच कंझरवेटिव्ह पक्षाला एकूण अंदाजे ४२% मतं मिळाली.

ब्रिटनमध्ये एकूण ११ वर्ष थॅचर यांचाच बोलबाला होता. आर्थिक आघाडीवर चांगलं काम केल्यामुळे आणि उदारमतवादी धोरणांमुळे ब्रिटनमधे थॅचर तर अमेरिकेत रोनाल्ड रिगन सत्तेत आले. या प्रसंगी अमेरिका आणि ब्रिटन यांचे संबंध अत्यंत घट्ट होत गेले. शेवटी, ब्रिटनच्या ‘पोलादी स्त्री’ हे नाव थॅचर यांनी सार्थ केले.

 

निखिल कासखेडीकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

  ‘ टोंगा ’ हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया , मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. या राज्यावर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती , १९७० पर्यन्त... त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला ... हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण विशेष असं सांगण्यासारखं १५ जानेवारी २०२२ पर्यन्त असं काही नव्हतं. पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या ‘ हुंगा टोंगा हुंगा हापाई ’ या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला टोंगा हे नाव माहीत झालं. या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं , असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली... पाण्याने प्रदेश व्य...

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्...