मुख्य सामग्रीवर वगळा

आणि मुत्सद्दी गेले संपावर... !

 आपण अमुक कामगार संपावर गेले, तमुक कर्मचारी संपावर गेले त्यांनी निदर्शनं केली, डॉक्टर संपावर गेले अश्या बातम्या वाचत असतो, टीव्ही वर पहातसुद्धा असतो. पण आपल्याला विश्वास बसणार नाही अश्या गोष्टी जगभरात घडत आहेत. जर तुम्हाला कोणी सांगितलं की एका देशातले परराष्ट्र मंत्रालायचे अधिकारी, कर्मचारी, वेगवेगळ्या देशातले राजदूत, मुत्सद्दी हे संपावर गेले, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? हो हे खरं आहे आणि असं घडलंसुद्धा आहे. फ्रांसच्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी, तसंच फ्रांसचे जे विविध देशातले राजदूत, मुत्सद्दी हे संपावर गेले होते. २ जून २०२२ म्हणजे गुरुवारी फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयातील कर्मचाऱ्यानी फ्रान्सच्या सद्य सरकारच्या विरुद्ध निदर्शने केली. यावेळी २०० मुत्सद्दी फ्रेंच परराष्ट्र मंत्रालयाबाहेर उपस्थित होते. तसंच फ्रान्सच्या विविध देशातल्या मिशन्स वर असलेल्या राजदूतानीसुद्धा ऑनलाइन उपस्थिती दाखवली, त्यानीसुद्धा काम बंद आंदोलन केलं.

फ्रान्समध्ये गेल्या २० वर्षात हे पहिल्यांदा घडलं आहे की अश्या प्रकारे परराष्ट्र मंत्रालयातले अधिकारी संपावर गेले आहेत. फ्रांसचे अझरबाईजान मधले राजदूत असलेले झाकरी ग्रॉस यांनी ट्विटर वर ट्विट केलं की फ्रांसचे मुत्सद्दी संपूर्ण तन मन लावून काम करत आहेत, पण त्यांना कमी पगार मिळतो, तसंच त्यांना गरजेपेक्षा ज्यास्त काम करावं लागतं आणि त्यांना मदतीला असणारा कर्मचारी वर्ग हा अगदीच तुटपुंजा आहे. फ्रांसचे अध्यक्ष एमन्युएल माकरों यांनी तर फ्रान्सच्या प्रशासनाच्या विरुद्ध जाऊन फ्रांसचे मुत्सद्दी काम करतात आणि स्वतःच्या कामाकडे दुर्लक्ष करतात असे आरोप मागे केले होते.

फ्रेंच सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयातला कर्मचारी वर्ग कमी करणार असल्याच्या आणि परराष्ट्र मंत्रालयात सुधारणा घडवून आणण्याच्या विरोधात हा संप फ्रेंच मुत्सद्दयानी केला. अमेरिका आणि चीन यांच्या नंतर फ्रान्सचा परराष्ट्र मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचा वर्ग हा जगातला तिसरा सगळ्यात मोठा वर्ग आहे. फ्रांसकडे एकूण १८०० मुत्सद्दी वेगवेगळ्या मिशन्स वर आहेत, तर फ्रेंच परराष्ट्र मंत्रालयात काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाची संख्या १३,५०० इतकी आहे. फ्रेंच मुत्सद्दयाना ही काळजी आहे की फ्रेंच सरकारच्या निर्णयामुळे फ्रेंच सरकारचच नुकसान होतं आहे आणि यामुळे फ्रान्सचा जो दबदबा युरोपमध्ये आणि जगामध्ये आहे त्याला तडा जाऊ शकतो. फ्रेंच सरकारने फ्रान्सच्या प्रशासनात परराष्ट्र मंत्रालयाच्या कर्मचारी वर्गाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे जो जानेवारी पासून लागू होईल. यात मंत्रालयातील कर्मचारी वर्गाला साधारण प्रशासकीय सेवेमध्ये विलीन केलं जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कमी जागांसाठी ज्यास्त लोक अश्या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे प्रचंड प्रमाणात स्पर्धा वाढीस लागेल आणि याचा मुत्सद्दयानवर परिणाम होईल अशी भीती सद्यस्थितीला अंतर्भूत असलेल्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यानी व्यक्त केली आहे. दुसरी एक चिंता सद्यस्थितीतल्या फ्रेंच मुत्सद्दयाना सतावते आहे ती म्हणजे मंत्रालायसाठी आणि एकूण परराष्ट्र सेवेसाठी असणाऱ्या बजेट मध्ये केली गेलेली कपात... बजेटमध्ये केलेल्या कपातीमुळे परराष्ट्र मंत्रालयाच्या कर्मचारी वर्गात २००७ पासून २०% इतकी कपात झाली आहे.

फ्रान्सची एलिट डिप्लोमॅटीक कॉर्प्स जी सोळाव्या शतकापासून अस्तित्वात आहे ती आतापर्यन्त साधारण प्रशासकीय सेवेपासून वेगळी ठेवण्यात आली होती. पण आता प्रशासकीय सेवा आणि परराष्ट्र सेवा यांचं एकत्रीकरण करून सरसकट सगळे नियम आता फ्रेंच परराष्ट्र सेवेला लागू होणार आहेत. यातला अजून एक भाग म्हणजे, प्रशासकीय सेवा आणि परराष्ट्र सेवा यांचं एकत्रीकरण केल्यामुळे प्रशासकीय सेवेत असणारे अधिकारी स्वतःच खातं बदलून परराष्ट्र सेवेत जाऊ शकणार आहेत. या खातेबदलामुळे जागा कमी आणि उमेदवार ज्यास्त, स्पर्धा ज्यास्त अशी परिस्थिती उद्भवणार आहे. आणि या गोष्टीला सध्याच्या फ्रेंच मुत्सदयांचा विरोध आहे. थोडक्यात या मुत्सदयांच्या म्हणण्यानुसार, आता पर्यन्त परराष्ट्र सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यानी इतक्या वर्षाच्या अनुभवातून आणि खडतर अश्या घेतलेल्या विशिष्ट प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध केलं. पण याची पुनरावृत्ति होईल याची शाश्वती नाही कारण प्रशासकीय सेवेतले कर्मचारी यांनी खातं बदलून परराष्ट्र सेवेत काम केलं तर इतके वर्ष खडतर मेहनत घेऊन परराष्ट्र सेवेतल्या अधिकाऱ्यानी जे मिळवलं आहे ते गमवायची वेळ येईल. अश्या परिस्थितीत परराष्ट्र सेवेतल्या अधिकाऱ्यांच्या अनुभवसिद्ध अश्या कृतीला , त्यांच्या कामाला काहीही किंमत राहणार नाही.

हा केलेला संप एक दिवसाचा होता. या संपावर फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्री कॅथरिन कॉलॉन यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. भारतात राहणाऱ्या आपल्यासारख्या लोकाना हे चमत्कारिक वाटेल, याचं कारण आपण फक्त कल्पना करून बघा की भारतीय परराष्ट्र सेवेतले अधिकारी, राजदूत, मुत्सद्दी हे काही काळासाठी संपावर गेले आणि त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले तर काय परिस्थिती उदभवेल! असं होऊ नये, पण फक्त कल्पना जरी केली तरी पण आपल्याला चमत्कारिक आणि रंजक वाटेल.

याप्रसंगी फ्रांस सरकार आणि फ्रेंच परराष्ट्र मंत्रालयातल्या कर्मचारी वर्ग, राजदूत आणि मुत्सद्दी यांच्या मध्ये चर्चा होऊन काहीतरी मार्ग निघेल अशी अपेक्षा करुयात.

 

निखिल कासखेडीकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

हे आहे ज्ञात इतिहासातलं सगळ्यात कमी काळ चाललेलं युद्ध!

  युद्धाच्या कथा रम्य असतात असं आपण नेहमी म्हणतो आणि ऐकतो. प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि आधुनिक काळ असं आपण जर इतिहासाची काळानुसार विभागणी केली तर आपल्याला आढळेल की अगदी समस्त इतिहासात कुठली एक गोष्ट वारंवार घडत असेल तसंच कुठली एक गोष्ट शाश्वत असेल तर ती आहे युद्ध आणि युद्धच. यावर कोणाचही दुमत होणार नाही... मग तो इतिहास अगदी रोमन असो, ग्रीक असो, चीनचा असो ... थोडक्यात कुठलाही असो, पण याला अपवाद फक्त भारताचा आहे. भारताने स्वतःच्या साम्राज्यविस्तारासाठी कधीही कोणावरही युद्ध लादलं नाही, हे विशेष आहे. साम्राज्यवाढीसाठी, त्याच्या विस्तारासाठी, महत्वाकांक्षेसाठी, अजरामर होण्यासाठी इतिहासात युद्ध लढली गेली... यात एकाचा जय तर दुसऱ्याचा पराजय... अगदी आजच्या काळातलं उदाहरण घ्यायचं म्हणजे रशिया आणि युक्रेनमधलं युद्धं. पुतीन यांचा उद्देश हा साम्राज्यविस्ताराचा आहे, तर यूक्रेनला वाचवण्यासाठी पश्चिमी जग पुढे सरसावलं आहे. तर अशी ही आहे युद्ध लढण्यामागची प्रेरणा. बरं ही युद्ध दीर्घ काळासाठी लढली गेल्याचीही उदाहरण आहेत. आधुनिक जगातलं विसाव्या शतकातलं उदाहरण घ्यायचं झाल्यास पहिलं आणि दुसरं महायुद्ध...

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्...