मुख्य सामग्रीवर वगळा

मलेशियन एअरलाइन्स एम एच ३७० – एक न उलगलेलं कोडं!

 आज जग खूप जवळ आलं आहे. ज्या गोष्टी आधी ऐशोराम म्हणून गणल्या जात होत्या, त्या आज सामान्य, मध्यमवर्गीय माणसांच्या कह्यात आल्या आहेत. विमान प्रवास हा त्यातलाच एक भाग. पूर्वी विमान प्रवास हे एक स्वप्न होतं किंवा ती अशक्य गोष्ट वाटायची. जागतिकीकरणाच्या प्रवाहात आज अनेक गोष्टी सामान्य माणसांपर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. याचंच फलित म्हणजे भौतिक सुखाच्या गोष्टी आज सगळ्याना परवडणाऱ्या झाल्या आहेत. इथे आपण महासत्ता म्हणून अमेरिकेचं उदाहरण घेऊ शकतो. एक गमतीचा भाग म्हणून पाहिल्यास अमेरिकेमध्ये लोक बस आणि रेलवेपेक्षा विमानाने देशांतर्गत प्रवास करतात. आपल्याला ज्या सोयीस्कररीत्या बस प्रवास करता येतो, तेवढाच किंवा त्याच्या कितीतरी पटीने अधिक आरामात लोक विमानाने प्रवास करतात. अमेरिकेप्रमाणे भारतातसुद्धा असं होऊ शकतं, हे शक्य आहे. त्याला थोडा काळ जाईल. विमान प्रवास हा सुरक्षित आहे हे जेंव्हा लक्षात येईल आणि लोकांच्या हातात पैसा येईल तेंव्हा भारतातसुद्धा हे शक्य होईल. पण याचा अर्थ विमान दुर्घटना घडू शकत नाहीत असाही नाही. अशीच एक विमान प्रवासाच्या इतिहासात चक्रावून टाकणारी घटना घडली. मलेशियन एअरलाइन्सचं ३७० विमान (एम एच ३७०) हे अचानक आपला नियोजित मार्ग बदलून उलट्या दिशेला येऊन नाहीस झालं. आतापर्यंतच्या विमान प्रवासाच्या इतिहासात अश्या घटना घडल्या नाहीत.

एम एच ३७० हे मलेशियन एअरलाइन्सचं विमान क्वालालंपूरहून बिजींगला निघालं होतं. हे विमान बोईंग ७७७ जातीचं होतं. यात केबिन क्रू आणि प्रवासी धरून एकूण २३९ जण होते. यापैकी २२७ प्रवासी होते तर १२ क्रू मेंबर्स होते. तसच या विमानात १३ वेगवेगळ्या देशांचे प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये चीनी प्रवासी ज्यास्त होते. तसंच मलेशियाचे सुद्धा बरेच नागरिक प्रवास करत होते. अजून एक दुर्दैवी गोष्ट म्हणजे यात पाच भारतीय प्रवासी होते. विमान निघण्याची तारीख होती ८ मार्च २०१४... ! स्थानिक वेळेनुसार एम एच ३७० ने बरोबर १२.४१ वाजता टेक ऑफ केलं. साधारण ०१.०१ ला विमान ३५००० फुट उंचीवर होतं. Aircraft Communication Addressing And Reporting System ने (या प्रणाली नुसार उपग्रह किंवा रेडियो सेटने विमान आणि ग्राऊंड स्टेशन्स यांच्यामध्ये संपर्क प्रस्थापित केला जातो... विमान आणि ग्राऊंड स्टेशन्स यांच्यामध्ये छोट्या संदेशांची देवाण घेवाण या प्रणालीद्वारे होते.) विमानाच्या सद्य स्थितीबद्दल असलेले शेवटचे ट्रान्समिशन ०१.०७ ला केलं. यानंतर ही प्रणाली स्विच ऑफ करण्यात आली. केबिन क्रू चं शेवटचं बोलणं ०१.१९ ला झालं. यानंतर ०१.२१ ला ज्या ट्रान्सपोंडरवरुन विमानाचं एअर ट्रॅफिक कंट्रोलशी बोलणं झालं तो बंद करण्यात आला. असं जरी असलं तरीसुद्धा मलेशियन मिलिटरी रडारवर ०२.२२ पर्यन्त विमान ट्रॅक केलं जात होतं. यावेळी ते अंदमानच्या समुद्रावर उडत होतं.

हा सगळा घटनाक्रम या विमानाच्या संदर्भात लक्षात येईल. पण असं अचानकपणे आणि इतक्या जलद गतीने हे सगळं कसं काय घडलं, नक्की काय झालं? विमान विरुद्ध दिशेने का उडालं ? तसंच ते हायजॅक केलं गेलं होतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनही सापडलेली नाहीत आणि मिळालीसुद्धा नाहीत. २४ मार्च २०१४ ला मलेशियाचे प्रधानमंत्री नजीब रझाक यांनी ब्रिटिश एजन्सीचा हवाला देत सांगितलं की एम एच ३७० विमान हिंद महासागरात दक्षिण पश्चिम ऑस्ट्रेलिया पासून जवळपास २५०० किलोमीटर अंतरावर क्रॅश झालं. या विमानाचे अवशेष २०१५ मध्ये पाहिल्यांदा हिंद महासागरात एका फ्रेंच बेटाजवळ सापडल्याचा दावा केला गेला.

विमान क्रॅश झाल्याचं निदर्शनात आल्या नंतर मग तर कॉनसपीरसी थेएरिज जगभर सुरू झाल्या. कोणी म्हटलं इंजिनात बिघाड झाल्याने विमान क्रॅश झालं तर कोणी म्हटलं पायलटने आत्महत्या केली. बरं या परिस्थितीत विमान हायजॅक केलं गेलं होतं का? पण अससुद्धा निदर्शनास आलं  नाही. याचं कारण जर कोणी हायजॅक केलं असतं तर कुठल्यानकुठल्या गटाने अपहरणाची जबाबदारी स्वीकारली असती. आणि विमानाचं अपहरण करून दहशतवाद्यानी ते दक्षिण हिंद महासागरात का क्रॅश केलं असतं. बरं विमानातले सिग्नल आतून कोणी केबिन क्रू ने त्याला आत्महत्या करण्यासाठी बंद केले असतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण केबिन क्रू पैकी आणि खुद्द कॅप्टनपैकी आधी कोणाच्याही देहबोलीत किंवा त्यांच्या वागण्या बोलण्यात काही बदल दिसून आला नाही. अजून एक शक्यता वर्तवण्यात आली की विमानाला मीसाईलने पाडण्यात आले, पण मग अश्या प्रकारचे कुठलेही अवशेष आणि पुरावे मिळाले नाहीत, आढळले नाहीत.

आज विमान नाहीसं होण्याला आठ वर्ष झालीत, पण अजूनही विमान गायब होण्याचा पुरावा मिळाला नाही. मलेशियन सरकारने Ocean Infinity या अमेरिकेतल्या खाजगी कंपनीची मदत इथे घेतली आहे, आता यापुढे नवीन अद्ययावत उपकरणांसह या खाजगी कंपनीचे  लोक परत म्हणजे २०२३ च्या सुरवातीच्या काही दिवसात विमान शोधण्याचं मिशन परत नव्या जोमाने सुरू करण्यात येणार आहे. Ocean Infinity चं विशेष म्हणजे ही कंपनी समुद्राखालच्या किंवा महासागरच्या तळाशी असलेले अवशेष हे रोबोट च्या सहाय्याने शोधून काढू शकते.

या विमान दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या माणसांच्या नातेवाईकाना अजूनही आशा आहे की एम एच ३७० चं कोडं सुटू शकेल आणि त्यांच्याबद्दल माहिती कळू शकेल. शेवटी काहीतरी चांगलं घडेल या आशेवरच तर जग चालतं...

 

-निखिल कासखेडीकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंतप्रधान मोदींची अमेरिका भेट

                                    फोटो- गुगलवरुन साभार.    पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 ते 2 4 जून 2023 दरम्यान अमेरिका भेटीवर जात आहेत. ही भेट अधिकृत आहे म्हणजे ज्याला स्टेट व्हिजिट असं म्हणता येईल. ती अश्यासाठी की अमेरिकी अध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी फस्ट लेडी जिल बायडन यांच्या खास आमंत्रणवरून पंतप्रधान मोदी या अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. खरं म्हणजे या स्टेट व्हिजिट या साधारणपणे राष्ट्राच्या प्रमुखांसाठी असतात. इंग्रजीत ज्याला आपण ‘हेड ऑफ द स्टेट’ यांची भेट म्हणू शकतो, म्हणजे भारताच्या राष्ट्रपती या हेड ऑफ द स्टेट आहेत. पण हे प्रथमच होतंय की सरकारचा प्रमुख म्हणजे ‘हेड ऑफ द गवर्नमेंट’ म्हणून पंतप्रधान मोदी अमेरिकेला भेट देणार आहेत. यावरून ही भेट अमेरिकेसाठी किती महत्वाची आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो. पंतप्रधान मोदी सुरवातीला म्हणजे 21 जूनला न्यूयॉर्क इथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी 22 जूनला मोदी हे वॉशिंगटन डी. सी. ला जातील. तिथे पाहुणे म्हणून व्हाईट हाऊसमध्य

तुर्कस्तान, नाटो आणि वादविवाद!

  रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध सुरू होऊन आता जवळपास तीन महिन्यांच्या वर कालावधी झाला आहे. रशिया आणि यूक्रेनमध्ये तर घमासान लढाई चालू आहे. कधी रशियाचं पारडं जड तर कधी यूक्रेन बलशाली होतो आहे का, रशियावर हावी होतो आहे का असं वाटू लागतं. बातम्या तर अश्या येतआहेत की आता रशिया आण्विक युद्ध सुरू करणार की काय... कोणी म्हणतं रशिया – युक्रेन युद्धाची परिणीती तिसरं महायुद्ध सुरू होण्यात होईल. कोणी म्हणतं आता तर युक्रेनला पाश्चिमात्य देश मदत करत आहेत, म्हणजे अमेरिका आणि तिचे मित्र राष्ट्र युक्रेनला युद्ध सामग्री पुरवत आहेत, त्यामुळे रशिया विरुद्धच युद्ध युक्रेन जिंकेल. हे कमी म्हणून की काय काही दिवसांपूर्वी फिनलंड आणि स्वीडन या देशानी रशियाच्या आव्हानाला घाबरून “आम्हाला नाटोचं सदस्यत्व द्या” अशी मागणी अमेरिकेकडे आणि नाटोकडे केली. अमेरिकेचा तर आनंद गगनात मावेना... जणू काही रशियाविरुद्ध हालचाली करण्याचा मनसुबाच आखला होता. यात भरिस भर म्हणजे तुर्कस्तान नावाच्या देशाने स्वीडन आणि फिनलंड यांच्या नाटो सदस्यत्वाला आम्ही विरोध करू, म्हणजे आम्ही व्हेटो (नकाराधिकार) वापरू आणि फिनलंड आणि स्वीडनला कदापिही ना

डॉझीअर रेस्क्यू ऑपरेशन!

  दहशतवाद हा जगाला आज नवीन राहिलेला नाही. ९/११ च्या हल्ल्यानंतर सगळे जग जागं झालं. भारतासारख्या देशाने दहशतवाद फार पूर्वीच काश्मीर च्या निमित्ताने पाहिलेला आहे. जगात आज अनेक विषय ज्वलंत आहेत, मग ते राजकीय असो अथवा आर्थिक किंवा सामाजिक . दहशतवाद हा विषय जवळपास या तीनही विषयांशी निगडीत आहे आणि त्याचा सामना नाईलाजाने सैनिकी कारवाईनेच करावा लागतो. यात अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागतात. काही निरपराध लोकसुद्धा प्रसंगी मारले जातात. पण सैनिकी कारवाई हा शेवटचा पर्याय असतो.   आता पर्यंत जगात अनेक सैनिकी कारवाया गाजल्या. त्यातल्या काही प्रसिद्ध पण झाल्या. यात दुस-या  महायुद्धातल्या कारवायांचा सुद्धा समावेश आहे. काही कारवाया शीतयुद्धात गाजल्या. काही मोजक्या कारवायांबद्दल सांगायचं झाल्यास ह्या सैनिकी कारवाया काही मिनिटांच्या होत्या, त्यातलीच एक म्हणजे डॉझीअर रेस्क्यू ऑपरेशन! इटलीच्या एलिट  म्हणजेच सर्वोत्तम कमांडोंच्या मदतीने केलेली अमेरिकेच्या नाटोस्थित एका सर्वोच्च सैनिकी अधिका-याला वाचवायची कारवाई. या एका विशेष युनिटने भाग घेतला. या युनिटचे नाव - इटालीअन अँटी टेरोरीस्त नुक्लिव ओपेरातीव से