मुख्य सामग्रीवर वगळा

हे आहे ज्ञात इतिहासातलं सगळ्यात कमी काळ चाललेलं युद्ध!

 युद्धाच्या कथा रम्य असतात असं आपण नेहमी म्हणतो आणि ऐकतो. प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि आधुनिक काळ असं आपण जर इतिहासाची काळानुसार विभागणी केली तर आपल्याला आढळेल की अगदी समस्त इतिहासात कुठली एक गोष्ट वारंवार घडत असेल तसंच कुठली एक गोष्ट शाश्वत असेल तर ती आहे युद्ध आणि युद्धच. यावर कोणाचही दुमत होणार नाही... मग तो इतिहास अगदी रोमन असो, ग्रीक असो, चीनचा असो ... थोडक्यात कुठलाही असो, पण याला अपवाद फक्त भारताचा आहे. भारताने स्वतःच्या साम्राज्यविस्तारासाठी कधीही कोणावरही युद्ध लादलं नाही, हे विशेष आहे. साम्राज्यवाढीसाठी, त्याच्या विस्तारासाठी, महत्वाकांक्षेसाठी, अजरामर होण्यासाठी इतिहासात युद्ध लढली गेली... यात एकाचा जय तर दुसऱ्याचा पराजय... अगदी आजच्या काळातलं उदाहरण घ्यायचं म्हणजे रशिया आणि युक्रेनमधलं युद्धं. पुतीन यांचा उद्देश हा साम्राज्यविस्ताराचा आहे, तर यूक्रेनला वाचवण्यासाठी पश्चिमी जग पुढे सरसावलं आहे. तर अशी ही आहे युद्ध लढण्यामागची प्रेरणा. बरं ही युद्ध दीर्घ काळासाठी लढली गेल्याचीही उदाहरण आहेत. आधुनिक जगातलं विसाव्या शतकातलं उदाहरण घ्यायचं झाल्यास पहिलं आणि दुसरं महायुद्धाची घेता येतील. ही युद्धं अनुक्रमे अगदी चार चार वर्ष चालली. पण तुम्हाला जर सांगितलं की नोंद ठेवलेल्या इतिहासात सगळ्यात कमी काळ लढलेलं युद्ध पण आहे तर ते आहे ब्रिटिश साम्राज्य आणि झांजीबार यांच्यातलं. तुम्ही अंदाज लावू शकता का? म्हणजे किती काळ हे युद्ध चाललं असेल? आपल्याला ज्यास्त काळ चाललेली युद्ध माहिती आहेत पण असंही एक युद्ध आहे जे खूप कमी वेळ चाललं. हो.. ब्रिटन आणि झांजीबार या दोघांमधलं युद्ध चाललं केवळ चाळीस मिनिटं. युद्धाची तारीख आहे २७ ऑगस्ट १८९६.  

ब्रिटिश साम्राज्य, विस्तारासाठी आतुर होतं, व्यापारासाठी नवीन नवीन वसाहती स्वतःच्या साम्राज्यात घेऊन मग वसाहतींमधला कच्चा माल स्वदेशात नेऊन त्यापासून वस्तूंची निर्मिती केली आणि त्या वस्तु ब्रिटिश वसाहतींमध्ये विकण्याच्या करामती केल्या. यात आपल्या भारताचं ज्वलंत उदाहरण आहे. अश्याच काहिश्या उद्देशाने ब्रिटनने पूर्व अफ्रिकन बेट असलेल्या झांजीबार सलतनत बरोबर युद्ध केलं.

झांजीबारचा सुलतान मृत्यू पावल्यानंतर त्याच्या जागी त्याचा मुलगा राजकुमार ‘खालिद इब्न बरघाश’, याने ब्रिटिश सत्तेच्या हातात सूत्र देण्याच्या मुद्द्यावरून आणि ब्रिटनच्या मर्जितला राजा निवडण्यावरून ब्रिटिशांबरोबर थेट युद्धच केलं. खालिदने ३००० सैनिक ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी जमवले, यात सुलतानचे खास सरदार, सैनिकसुद्धा होते. तसंच एक जहाजसुद्धा त्यांच्या दीमतीला होतं. तर इकडे ब्रिटिशांनी ४०० झांजीबारी एकनिष्ठ सैनिक आणि ब्रिटिश मरीन्स जमा केले. त्यांच्या दिमतीला चार रॉयल युद्धनौकासुद्धा बंदरात हजर होत्या. इकडे खालिद ने राजवाडा सोडण्यास नकार दिला आणि युद्ध लढण्यासाठी तो तयार झाला. ब्रिटिशांनी आधी शरण येण्याचा खलिता खालिदला पाठवला, पण त्याने नकार दिल्यानंतर ब्रिटिश  आरमाराचा रियर अडमिरल रॉसनने एच एम एस रकून, थ्रश आणि स्पॅरो युद्धनौकाना राजवाड्यावर हल्ला करण्याचं फर्मान काढलं. झालं ... ब्रिटिश युद्धनौका अक्षरशः आग ओकू लागल्या. हा प्रकार चाळीस मिनिटं चालला. यादरम्यान खालिदचे साधारण ५०० सैनिक मारले गेले, तर दुसरीकडे ब्रिटिशांचा केवळ एक सैनिक जखमी झाला. शेवटी ब्रिटिशांसामोर खालिदने शरणागती पत्करली.

याचा थोडा इतिहासपण इथे लक्षात यावा लागेल. बरघाशसमोर युरोपीयन सत्तानी सुरवातीला पर्याय ठेवले. त्याला सांगितलं की तुझ्या साम्राज्याच्या भागांचे तुकडे करून त्यांची विभागणी करून त्यांना ब्रिटन आणि जर्मनीकडे दे. त्यानुसार खालिदने मेनलँड जर्मनिकडे तर बेटाचा काही भाग ब्रिटिशांकडे देण्याच्या निर्णयाला संमती दिली. तसंच त्याला दोन गोष्टी मान्य करण्याचे सांगितले. एक म्हणजे गुलामीची पद्धत बंद करावी आणि दुसरं व्यापारासाठी अर्थव्यवस्था पूर्वीप्रमाणे खुली करावी. तसच यापुढच्या सुलतानाकडे राज्यकारभारात कमी अधिकार असतील आणि ब्रिटिशांकडे ज्यास्त अधिकार असतील. याला त्याने विरोध केला. त्याच्याजागी ब्रिटिशांनी हमाद नावाच्या व्यक्तीला गादीवर बसण्यासाठी पाठिंबा दिला, आणि अश्या परिस्थितीत युद्धाचा अटळ पर्याय समोर होता.

अश्या प्रकारे केवळ अगदी काही मिनिटांचं युद्ध दोघांमध्ये होऊन त्याची परिणीती ब्रिटिश जिंकण्यात झाली. अश्या या इतिहासाच्या नोंदीमद्धे सगळ्यात कमी काळ चाललेलं युद्ध म्हणून ब्रिटिश - झांजीबार युद्धाचं नाव घेतलं जातं.

१९६३ साली झांजीबारला ब्रिटिशांची प्रोटेकटोरेट म्हणून मुक्त करून स्वातंत्र्य देण्यात आलं. आज झांजीबार हा टांझानियाचा स्वायत्त प्रदेश आहे.


-निखिल कासखेडीकर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्...