मुख्य सामग्रीवर वगळा

बर्फवृष्टी अमेरिकेतली... आणि माणुसकी!

 अमेरिकेत साधारणतः डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यात बर्‍याच शहरांमध्ये बर्फवृष्टी होते. आपल्याकडे भारतात फक्त हिमाचल प्रदेश किंवा कश्मीर खोर्‍यातच बर्फवृष्टी अनुभवता येते. अर्थात प्रत्येक ठिकाणचं वातावरण वेगवेगळं असतं. कुठे ऊन जास्त तर कुठे पाऊस जास्त तर कुठे थंडी जास्त. आपल्याकडे म्हणजे भारतात तीन ऋतु आपण अनुभवतो. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. पण इतर थंड प्रदेशांमध्ये उन्हाळा आणि हिवाळा हे दोनच ऋतु असतात. तर सांगायचं असं की अमेरिकेत बर्फवृष्टी होणं हे नवीन नाही, परंतु प्रमाणाबाहेर बर्फ पडणं हे मात्र जनजीवन विस्कळीत होण्याचं कारण ठरू शकतं. आताही तसच घडलं. अगदी दोन दिवसापूर्वी अमेरिकेतल्या व्हर्जिनिया प्रांतात अतिबर्फवृष्टीमुळे चक्क ५० मैलांच्या पट्ट्यात असलेल्या इंटर-स्टेट ९५ (हे तिथल्या हायवेचं नाव) या महामार्गावर ट्रॅफिक जाम झाली होती. तुम्ही म्हणाल आपल्याइथेही मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टँकर उलटल्यामुळे किंवा कुठला अपघात झाल्यामुळे ट्रॅफिक जाम होऊ शकते. मग अमेरिकेचं काय घेऊन बसलात? पण ही आय ९५ हायवे वर ट्रॅफिक जाम झाली होती ती इतकी प्रचंड होती की लोक अक्षरशः २५ -३० तासांसाठी आपल्या गाड्यांमध्ये अडकून बसले होते... बरं आजूबाजूच हवामान चांगलं असेल तर आपण गाडीच्या बाहेर तरी पडू शकतो, पाय मोकळे करू शकतो, किंवा अवघडलेल्या स्थितीतून आपल्या वाहनातून बाहेर पडू शकतो. पण आय ९५ या महामार्गावर प्रचंड बर्फवृष्टी झाल्यामुळे, बर्फ साचल्यामुळे मोठे मोठे ट्रक, छोट्या गाड्या असं सगळं ठप्प झालं होतं. प्रचंड प्रमाणात बर्फ साठला होता. आपत्कालीन पथकाला, तसंच अग्निशमन दलाला सुद्धा अडकून पडलेल्या व्यक्तींना मदत करताना अडथळे येत होते.

ज्या प्रमाणे अमेरिकेतल्या सामान्य नागरिकाना या बर्फावृष्टीमुळे स्वत:च्या वाहनातच बसावं लागलं होतं, त्या प्रमाणे व्ही आय पी व्यक्ति सुद्धा यात अडकल्या होत्या. परिस्थितीच तशी होती. तर, याचा फटका खुद्द अमेरिकी अध्यक्ष बायडेन यांनाही बसला. बायडेन यांना जवळजवळ १ तास त्यांच्या एअर फोर्स वन या खास विमानातच थांबून राहावं लागलं ... याचं कारण विमानाच्या धावपट्टीवर बर्फ साचल्यामुळे विमान जमिनीवर उतरवणार तरी कसं... मग विमानाला १ तास आकाशातच घिरट्या घालाव्या लागल्या. मग चक्क बर्फ हटवणार्‍या गाड्यांना पाचारण करण्यात आलं... आणि शेवटी बायडेन सुखरूपपणे त्यांच्या आलीशान अशा क्याडीलक या खास गाडीत बसून त्यांचा ताफा पुढच्या ठिकाणाकडे रवाना झाला.

ही झाली अध्यक्षांच्या बाबतीतली गोष्ट. पण अमेरिकेचे एक सिनेटर (म्हणजे खासदार) डेमोक्रटिक पक्षाचे टिम केन हे सुद्धा चक्क २६ तास त्यांच्याच गाडीत बसून होते, अडकले होते, ते ही आय ९५ या महामार्गावर ट्रॅफिक जाम मध्ये होते आणि मार्ग पूर्ववत झाल्यानंतर ते कॅपिटोल (अमेरिकी कॉंग्रेसचं सभागृह)  या त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचले.

आपल्याला वाचताना खरं तर केवळ रोमांचित करणारा अनुभव वाटेल, पण २५- ३० तास फक्त एकाच जागी बसून वेळ घालवणे किती अवघड आहे हे ज्यांनी अनुभवलं त्यांनाच कळेल. अन्न, पाणी, हवा, जागा, थंडीपासून बचाव करण्यासाठी खास कपडे, प्रथमोपचार करण्यासाठी लागणारं साहित्य हे जवळ नसेल तर काय करणार.

अतिप्रगत असणार्‍या अमेरिकेमध्ये अशी परिस्थिती? हे वाचून कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल. पण निसर्ग अमेरिका आणि भारत, किंवा गरीब श्रीमंत, असा भेदभाव करत नाही... त्याच्या रौद्र रूपासमोर मानव तो काय? त्या परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडण्याची तेवढी इच्छाच आपण व्यक्त करू शकतो...

व्हर्जिनियातील ह्या ट्रॅफिक जाम मध्ये बर्फाबरोबर पाऊस पडत होता. अचानक कोसळलेल्या या आपत्तीत कोणाकडे अन्न शिल्लक नव्हतं, तर कोणाच्या गाडीतलं इंधन संपलं होतं... काहींनी सांगितलं की हा त्यांच्या आयुष्यातला एकदा अनुभवाला येणारा असा लाइफटाईम अनुभव होता. आसपासच्या लोकांनी ट्रॅफिक जाम मधील अडकलेल्या लोकांना मदत केली. एका गाडीतून पती पत्नी प्रवास करत होते, ते या ट्रॅफिक जाम मध्ये अडकले होते. त्यांना पुढेच एका ब्रेड ब्रेकिंग कंपनीचा ट्रक दिसल्यावर, त्यांनी लगेच त्या कंपनीच्या ग्राहक सुविधा केंद्राला फोन करून, या ट्रॅफिक जाम मध्ये अडकलेल्या लोकांना ब्रेड आणि काही खाण्याचे पदार्थ पुरवता येतील का? अशी विचारणा केली, याची त्वरित दखल घेऊन कंपनीच्या लोकांनी ट्रक ड्रायव्हरला फोन केला आणि त्याने ट्रक उघडून आतले सामान आणि पदार्थांचं तिथल्या लोकांना वाटप केलं. संकटातल्या लोकांना एका कॉल वर मदत मिळाली होती. हे होतं माणुसकीच दर्शन. ही मोठी दिलासादायक बाब!     

हे नैसर्गिक संकट होतं पण डिझास्टर मॅनेजमेंटचं काय? वाहतूक ठप्प झाल्यामुळे त्यात अडकलेल्या नागरिकांनी आणि स्थानिक नेत्यांनी सरकारकडे एवढ्या मजबूत पायाभूत सुविधा असूनही इतका वेळ ट्रॅफिक जाम कशी झाली याबद्दल प्रशासनाला धारेवर धरलं. या संपूर्ण प्रकरणाची बायडेन प्रशासन योग्य ती दखल घेईलच.

-निखिल कासखेडीकर 

(हा लेख https://kfacts.in/ या पोर्टलवर जानेवारी 2022 मध्ये प्रकाशित झाला आहे.)  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंतप्रधान मोदींची अमेरिका भेट

                                    फोटो- गुगलवरुन साभार.    पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 ते 2 4 जून 2023 दरम्यान अमेरिका भेटीवर जात आहेत. ही भेट अधिकृत आहे म्हणजे ज्याला स्टेट व्हिजिट असं म्हणता येईल. ती अश्यासाठी की अमेरिकी अध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी फस्ट लेडी जिल बायडन यांच्या खास आमंत्रणवरून पंतप्रधान मोदी या अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. खरं म्हणजे या स्टेट व्हिजिट या साधारणपणे राष्ट्राच्या प्रमुखांसाठी असतात. इंग्रजीत ज्याला आपण ‘हेड ऑफ द स्टेट’ यांची भेट म्हणू शकतो, म्हणजे भारताच्या राष्ट्रपती या हेड ऑफ द स्टेट आहेत. पण हे प्रथमच होतंय की सरकारचा प्रमुख म्हणजे ‘हेड ऑफ द गवर्नमेंट’ म्हणून पंतप्रधान मोदी अमेरिकेला भेट देणार आहेत. यावरून ही भेट अमेरिकेसाठी किती महत्वाची आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो. पंतप्रधान मोदी सुरवातीला म्हणजे 21 जूनला न्यूयॉर्क इथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी 22 जूनला मोदी हे वॉशिंगटन डी. सी. ला जातील. तिथे पाहुणे म्हणून व्हाईट हाऊसमध्य

तुर्कस्तान, नाटो आणि वादविवाद!

  रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध सुरू होऊन आता जवळपास तीन महिन्यांच्या वर कालावधी झाला आहे. रशिया आणि यूक्रेनमध्ये तर घमासान लढाई चालू आहे. कधी रशियाचं पारडं जड तर कधी यूक्रेन बलशाली होतो आहे का, रशियावर हावी होतो आहे का असं वाटू लागतं. बातम्या तर अश्या येतआहेत की आता रशिया आण्विक युद्ध सुरू करणार की काय... कोणी म्हणतं रशिया – युक्रेन युद्धाची परिणीती तिसरं महायुद्ध सुरू होण्यात होईल. कोणी म्हणतं आता तर युक्रेनला पाश्चिमात्य देश मदत करत आहेत, म्हणजे अमेरिका आणि तिचे मित्र राष्ट्र युक्रेनला युद्ध सामग्री पुरवत आहेत, त्यामुळे रशिया विरुद्धच युद्ध युक्रेन जिंकेल. हे कमी म्हणून की काय काही दिवसांपूर्वी फिनलंड आणि स्वीडन या देशानी रशियाच्या आव्हानाला घाबरून “आम्हाला नाटोचं सदस्यत्व द्या” अशी मागणी अमेरिकेकडे आणि नाटोकडे केली. अमेरिकेचा तर आनंद गगनात मावेना... जणू काही रशियाविरुद्ध हालचाली करण्याचा मनसुबाच आखला होता. यात भरिस भर म्हणजे तुर्कस्तान नावाच्या देशाने स्वीडन आणि फिनलंड यांच्या नाटो सदस्यत्वाला आम्ही विरोध करू, म्हणजे आम्ही व्हेटो (नकाराधिकार) वापरू आणि फिनलंड आणि स्वीडनला कदापिही ना

तालिबानचे सध्याचे इस्लामी राष्ट्रांबरोबर असलेले संबंध

  तालिबान ... सदध्या अफगाणिस्तानात शरिया कायदा राबवण्याच्या उद्देशाने सत्ता ताब्यात घेणारी संघटना म्हणजे तालिबान... ‘ गुड तालिबान ’ आणि ‘ बॅड तालिबान ’ हा प्रकार अस्तित्वात नाही. जगभर इस्लामी राज्य स्थापन करण्याच्या उद्देशानेच जणू तालिबान आपली पावलं टाकताना दिसतं आहे. जगभर असलेली तथाकथित तज्ञ मंडळी म्हणत आहेत की तालिबान आता बदललं आहे आणि त्यांनी सर्वसमावेशक धोरण ठेवून महिला अन मुलांना समान वागणूक देणार असल्याचं जाहीर केलं आहे पण तसं तालिबानच्या कृतीतून अजिबात दिसत नाही. हा लेख लिहीत असताना ताज्या बातम्यांनुसार तालिबानबद्दल एक बातमी येऊन धडकली आहे. ती म्हटली तर अत्यंत चिंता वाढवणारी आहे आणि एकूणच गंभीरसुद्धा आहे  याचं कारण तालिबानची पावलं ज्या दिशेने पडत आहेत त्यावरून भविष्यात काय होईल याचा थोडा अंदाज बांधता येऊ शकतो. ती बातमी म्हणजे तालिबानच्या एका नेत्याने नुकतच असं म्हटलं आहे की अफगाणिस्तानात दिल्या जाणार्‍या शिक्षा जश्या पूर्वी तालिबान सत्तेवर असताना होत्या तश्याच स्वरुपात त्या परत अफगाणिस्तानात आणल्या जातील. यामध्ये हात पाय तोडणे , दगडाने ठेचून मारणे , तसंच त्यांच्यानुसार गुन्ह