मुख्य सामग्रीवर वगळा

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

 मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत, तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की, खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे? बरं अपराधी अपराध करून पळून जातो, मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे, पण मग त्यांना तपासासाठी, चौकशीसाठी, कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ !

जेंव्हा एका देशातून गुन्हेगार दुसर्‍या देशात पळून जातो, तेंव्हा त्याला पकडणं हे केवळ अशक्य होऊन जातं. याचं कारण कुठल्याही देशाची एक न्याय व्यवस्था असते. काही कायदे असतात. देशांतर्गत जर आरोपी फरार झाला असेल तर त्याला इतर राज्यातल्या तपास यंत्रणांकडून शोधून अटक केली जाऊ शकते. पण आरोपी जर देश सोडून दुसर्‍या देशात गेला तर तो विषय आंतरराष्ट्रीय होतो आणि मग इथे दोन देशांमधल्या कायदेशीर बाबींचा संबंध येतो. उदाहरणार्थ विजय मल्ल्या... विजय मल्ल्या इथून भारतातून गुन्हा करून पळून जाऊन त्याने लंडन गाठलं. तर अश्या परिस्थितीत भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये प्रत्यार्पण  करार झाला असेल तर आणि तरच मल्ल्यावर कारवाईसाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. प्रत्यार्पण करार म्हणजे, कुठल्या आरोपीने भारतात गुन्हा केला आणि तो ब्रिटनला पळाला तर, जर दोन देशांमध्ये म्हणजे या उदाहरणार्थ भारत आणि ब्रिटनमध्ये प्रत्यर्पण करार झाला असेल तरच आधी ब्रिटनमध्ये त्याची माहिती भारतीय अधिकार्‍यानी देऊन मग पुढे ब्रिटनमध्ये खटला दाखल केला जाऊ शकतो आणि मग भारतात त्या व्यक्तीवर खटला दाखल केला जाऊ शकतो. प्रत्यार्पण करार म्हणजे दोन देशांमध्ये झालेला एकमेकांच्या आरोपींचं आदानप्रदान करण्यासाठी केलेला करार.

भारत आणि ब्रिटन मध्ये १९९३ साली असा प्रत्यार्पण करार झाला आहे. त्याआधी भारतात गुन्हा केलेल्या भारतीय आरोपींना आणि त्यांनी पुढे जाऊन ब्रिटन मध्ये आसरा घेतला आहे अश्या आरोपींना भारतात आणण्यासाठी केलेली कायदेशीर योजना अस्तीत्वात नव्हती.

खरं म्हणजे आरोपी परदेशात पळून गेल्यानंतरच आपल्याला समजतं की आरोपीने गुन्हा केलेला आहे आणि तो परदेशात पळून गेला आहे, आणि मग सगळी प्रक्रिया चालू होते गुन्हेगाराला पकडण्याची... अश्या वेळेस, बरं प्रकरण इथपर्यंत थांबत नाही. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांचाही इथे सहभाग असतो. सुरवातीला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाला आरोपीबद्दल कागदपत्रे, पुरावे असं सगळं पाठवाव लागतं. ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाला पटलं की ती व्यक्ति खरच आरोपी आहे आणि तिने गुन्हा केला आहे तर अश्या परिस्थितीत ब्रिटनमधल्या न्यायालयात आरोपीवर खटला भरला जातो. जर ब्रिटनच्या न्यायालयात त्या आरोपीवर आरोप सिद्ध झाले तरच भारतात त्याच्यावर इथल्या न्यायालयात खटला सुरू होतो आणि मग इथेसुद्धा आरोप सिद्ध झाले की मग ड्युयल क्रिमीन्यालिटी कलमाअंतर्गत भारतात आरोपीला ब्रिटनमधून आणले जाऊ शकते. ही झाली एका कलमाबद्दलची बाब... पण इथे या व्यतिरिक्तसुद्धा कलमं आहेत. जर गुन्हा छोटा असेल तर ब्रिटनमधून आरोपीला भारतात आणले जाऊ शकत नाही. तसच जर आरोपी म्हणाला की भारतातले तुरुंग अस्वछ असतात, तिथे जीवाला धोका आहे किंवा तिथे टोर्चर केलं जातं, तर अश्या परिस्थितित मानवाधिकार संघटनांकडून किंवा आयोगाकडून त्या आरोपीला ब्रिटनमधून भारतात नेता येत नाही. मानवतावादी दृष्टीकोणातून त्या आरोपीकडे बघितलं जातं. यामध्ये तिसरी महत्वाची बाब म्हणजे जर भारत आणि ब्रिटन या दोन देशांमध्ये परराष्ट्र संबंध चांगले नसतील तर त्याचाही फायदा आरोपीला मिळू शकतो आणि त्याचं भारतात जाणं रद्द होऊ शकतं. अजून एक गम्मतीशीर मुद्दा म्हणजे जर भारतीय आरोपीने ब्रिटनमध्येच काहीतरी मोठा, गंभीर गुन्हा केला असेल तर त्याच्यावर ब्रिटनमध्ये खटला भरण्यात येतो, आणि मग भारतात केल्या गेलेल्या गुन्ह्यांचा खटला मागे पडतो याचा निश्चित फायदा आरोपीला मिळतो.

बरं मग प्रश्न उभा राहतो की ब्रिटन अश्या पद्धतीने परकीय आरोपींना सूट कशी देतो ?... तर ब्रिटनने अनेक देशांबरोबर असे करार केले आहेत, ज्यातून पळवाटा शोधून जगभरातले आरोपी गुन्हा करून ब्रिटनला पळून जातात... पण ब्रिटन असं करू का देतं? याचं उत्तर आहे... अर्थातच पैसा. ब्रिटीश सरकार जगभरातून आलेल्या आर्थिक गुन्हे केलेल्या आरोपींना आश्रय देतं आणि सांगतं तुम्ही तुमचे पैसे आमच्या देशात गुंतवा.

झालं, तर असं सगळं त्रांगडं आहे. गोलमाल है भाई सब गोलमाल है... आता तुम्हाला लक्षात आलं असेल की गुन्हा करणं आणि लंडनला जाणं यांच्यामध्ये काय कनेक्शन आहे ते... तर मित्रांनो अशी सगळी गम्मत आहे... !

-निखिल कासखेडीकर

(हा लेख https://kfacts.in/ या पोर्टलवर जानेवारी 2022 मध्ये प्रकाशित झाला आहे)   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंतप्रधान मोदींची अमेरिका भेट

                                    फोटो- गुगलवरुन साभार.    पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 ते 2 4 जून 2023 दरम्यान अमेरिका भेटीवर जात आहेत. ही भेट अधिकृत आहे म्हणजे ज्याला स्टेट व्हिजिट असं म्हणता येईल. ती अश्यासाठी की अमेरिकी अध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी फस्ट लेडी जिल बायडन यांच्या खास आमंत्रणवरून पंतप्रधान मोदी या अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. खरं म्हणजे या स्टेट व्हिजिट या साधारणपणे राष्ट्राच्या प्रमुखांसाठी असतात. इंग्रजीत ज्याला आपण ‘हेड ऑफ द स्टेट’ यांची भेट म्हणू शकतो, म्हणजे भारताच्या राष्ट्रपती या हेड ऑफ द स्टेट आहेत. पण हे प्रथमच होतंय की सरकारचा प्रमुख म्हणजे ‘हेड ऑफ द गवर्नमेंट’ म्हणून पंतप्रधान मोदी अमेरिकेला भेट देणार आहेत. यावरून ही भेट अमेरिकेसाठी किती महत्वाची आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो. पंतप्रधान मोदी सुरवातीला म्हणजे 21 जूनला न्यूयॉर्क इथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी 22 जूनला मोदी हे वॉशिंगटन डी. सी. ला जातील. तिथे पाहुणे म्हणून व्हाईट हाऊसमध्य

तुर्कस्तान, नाटो आणि वादविवाद!

  रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध सुरू होऊन आता जवळपास तीन महिन्यांच्या वर कालावधी झाला आहे. रशिया आणि यूक्रेनमध्ये तर घमासान लढाई चालू आहे. कधी रशियाचं पारडं जड तर कधी यूक्रेन बलशाली होतो आहे का, रशियावर हावी होतो आहे का असं वाटू लागतं. बातम्या तर अश्या येतआहेत की आता रशिया आण्विक युद्ध सुरू करणार की काय... कोणी म्हणतं रशिया – युक्रेन युद्धाची परिणीती तिसरं महायुद्ध सुरू होण्यात होईल. कोणी म्हणतं आता तर युक्रेनला पाश्चिमात्य देश मदत करत आहेत, म्हणजे अमेरिका आणि तिचे मित्र राष्ट्र युक्रेनला युद्ध सामग्री पुरवत आहेत, त्यामुळे रशिया विरुद्धच युद्ध युक्रेन जिंकेल. हे कमी म्हणून की काय काही दिवसांपूर्वी फिनलंड आणि स्वीडन या देशानी रशियाच्या आव्हानाला घाबरून “आम्हाला नाटोचं सदस्यत्व द्या” अशी मागणी अमेरिकेकडे आणि नाटोकडे केली. अमेरिकेचा तर आनंद गगनात मावेना... जणू काही रशियाविरुद्ध हालचाली करण्याचा मनसुबाच आखला होता. यात भरिस भर म्हणजे तुर्कस्तान नावाच्या देशाने स्वीडन आणि फिनलंड यांच्या नाटो सदस्यत्वाला आम्ही विरोध करू, म्हणजे आम्ही व्हेटो (नकाराधिकार) वापरू आणि फिनलंड आणि स्वीडनला कदापिही ना

तालिबानचे सध्याचे इस्लामी राष्ट्रांबरोबर असलेले संबंध

  तालिबान ... सदध्या अफगाणिस्तानात शरिया कायदा राबवण्याच्या उद्देशाने सत्ता ताब्यात घेणारी संघटना म्हणजे तालिबान... ‘ गुड तालिबान ’ आणि ‘ बॅड तालिबान ’ हा प्रकार अस्तित्वात नाही. जगभर इस्लामी राज्य स्थापन करण्याच्या उद्देशानेच जणू तालिबान आपली पावलं टाकताना दिसतं आहे. जगभर असलेली तथाकथित तज्ञ मंडळी म्हणत आहेत की तालिबान आता बदललं आहे आणि त्यांनी सर्वसमावेशक धोरण ठेवून महिला अन मुलांना समान वागणूक देणार असल्याचं जाहीर केलं आहे पण तसं तालिबानच्या कृतीतून अजिबात दिसत नाही. हा लेख लिहीत असताना ताज्या बातम्यांनुसार तालिबानबद्दल एक बातमी येऊन धडकली आहे. ती म्हटली तर अत्यंत चिंता वाढवणारी आहे आणि एकूणच गंभीरसुद्धा आहे  याचं कारण तालिबानची पावलं ज्या दिशेने पडत आहेत त्यावरून भविष्यात काय होईल याचा थोडा अंदाज बांधता येऊ शकतो. ती बातमी म्हणजे तालिबानच्या एका नेत्याने नुकतच असं म्हटलं आहे की अफगाणिस्तानात दिल्या जाणार्‍या शिक्षा जश्या पूर्वी तालिबान सत्तेवर असताना होत्या तश्याच स्वरुपात त्या परत अफगाणिस्तानात आणल्या जातील. यामध्ये हात पाय तोडणे , दगडाने ठेचून मारणे , तसंच त्यांच्यानुसार गुन्ह