मुख्य सामग्रीवर वगळा

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

 टोंगा हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया, मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. या राज्यावर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती, १९७० पर्यन्त... त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला ... हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण विशेष असं सांगण्यासारखं १५ जानेवारी २०२२ पर्यन्त असं काही नव्हतं. पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या हुंगा टोंगा हुंगा हापाई या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला टोंगा हे नाव माहीत झालं. या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं, असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली... पाण्याने प्रदेश व्यापून गेला. बरं स्फोट झाला तरीसुद्धा त्याचा परिणाम वातावरणात कदाचित कमी होऊ शकला असता, पण या स्फोटांनंतर टोंगा प्रशासनाने चक्क त्सुनामीची सूचना दिली. ज्वालामुखीचा उद्रेक इतका शक्तीशाली होता की त्यामुळे केवळ प्रशांत महासागरातच नाही तर अटलांटिक, क्या कॅरेबियन आणि भूमध्य भागातसुद्धा त्सुनामी आले.

ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे राखेचा पाऊस पडला. टोंगा विमानतळ बंद करण्यात आले. हवेत २० मैल इतक्या वातावरणात हे राखेचे ढग पसरले. ज्वालामुखीचा उद्रेक १० मिनिटच चालला आणि एक तास चाळीस मिनिटं इतक्या वेळ ही प्रक्रिया घडत होती. यामुळे चार लाख टन इतका सल्फर डाय ओक्साइड वायु वातावरणात सोडला गेला. समुद्राखाली झालेल्या स्फोटाने तर पाण्याखाली असलेल्या दळणवळणाच्या केबल्सचंसुद्धा खूप नुकसान झालं आहे. शास्त्रज्ञांच्या हवाल्यानुसार येणार्‍या काळात कदाचित दूरसंचार उपग्रहांवर आणि संदेशयंत्रणांवर म्हणजे GPS वर याचा परिणाम जाणवू शकतो.

ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या शॉक वेव्ह्ज्स या २००० किलोमीटर लांब  असलेल्या न्यूझीलंड मध्ये नोंदवल्या गेल्या. ऑस्ट्रेलिया मध्ये सुद्धा नोंद झाली. तर या स्फोटाचा आवाज सात तासानंतर अलास्का या अमेरिकेच्या प्रांतातसुद्धा ऐकू गेला इतका तो ताकदवान होता.

अगदी काही दिवसांपूर्वीच झालेल्या या उद्रेकामुळे किती नुकसान झालं आहे हे आताच सांगता येण कठीण आहे. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, अवकाशातूनसुद्धा या स्फोटाच्या शॉक वेव्ह्ज दिसल्या आणि दूरवर असलेल्या पेरु या दक्षिण अमेरिकेत स्थित असलेल्या देशातसुद्धा चक्क याचा परिणाम जाणवला. पेरूतल्या ला पामिया या तेल रिफायनरीत एक जहाज, तेल उतरवत होते, त्या दरम्यान आलेल्या लाटांमुळे जहाजाचा तोल गेला ते हलू  लागले आणि त्यातले तेल पाण्यात सांडून ते इतरत्र समुद्र तटांवर पसरले!

अनेक बेटांचे समूह असलेल्या या भागात स्फोटामुळे आणि त्सुनामीमुळे संपर्क तुटलेला आहे. या टोंगामध्ये एकूण १६९ बेटं आहेत, त्यातल्या ३६ बेटांवरच मानवी वस्ती आहे. या देशाची लोकसंख्या एकूण एक लाखाच्या आसपास आहे. साधारणतः ७० टक्के लोकसंख्या ही टोंगाटापू या मुख्य बेटावरची आहे.

न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि फिजी या देशांनी टोंगाला त्वरित मदत केली आहे. रॉयल न्यूझीलंड नेव्हीने आपली जहाज पाठवली आहेत, तर ऑस्ट्रेलियाने झालेलं नुकसान मोजण्यासाठी आणि पहाण्यासाठी त्यांच्या रॉयल ऑस्ट्रेलियन एअरफोर्सच्या विमानांची मदत देऊ केली आहे. तसंच चीन आणि सिंगापुरनेसुद्धा मदत देऊ केली आहे.

येणार्‍या काळात म्हणजेच पुढच्या काही दिवसात टोंगा मधली परिस्थिति कशी आहे याबद्दल आपल्याला कळू शकेल, जीवितहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढच्या काही दिवसात चित्र स्पष्ट होईल तोपर्यंत आपण थोडी वाट पाहुयात.

-निखिल कासखेडीकर

(हा लेख https://kfacts.in/ या पोर्टलवर जानेवारी 2022 मध्ये प्रकाशित झाला आहे)   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंतप्रधान मोदींची अमेरिका भेट

                                    फोटो- गुगलवरुन साभार.    पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 ते 2 4 जून 2023 दरम्यान अमेरिका भेटीवर जात आहेत. ही भेट अधिकृत आहे म्हणजे ज्याला स्टेट व्हिजिट असं म्हणता येईल. ती अश्यासाठी की अमेरिकी अध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी फस्ट लेडी जिल बायडन यांच्या खास आमंत्रणवरून पंतप्रधान मोदी या अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. खरं म्हणजे या स्टेट व्हिजिट या साधारणपणे राष्ट्राच्या प्रमुखांसाठी असतात. इंग्रजीत ज्याला आपण ‘हेड ऑफ द स्टेट’ यांची भेट म्हणू शकतो, म्हणजे भारताच्या राष्ट्रपती या हेड ऑफ द स्टेट आहेत. पण हे प्रथमच होतंय की सरकारचा प्रमुख म्हणजे ‘हेड ऑफ द गवर्नमेंट’ म्हणून पंतप्रधान मोदी अमेरिकेला भेट देणार आहेत. यावरून ही भेट अमेरिकेसाठी किती महत्वाची आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो. पंतप्रधान मोदी सुरवातीला म्हणजे 21 जूनला न्यूयॉर्क इथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी 22 जूनला मोदी हे वॉशिंगटन डी. सी. ला जातील. तिथे पाहुणे म्हणून व्हाईट हाऊसमध्य

तुर्कस्तान, नाटो आणि वादविवाद!

  रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध सुरू होऊन आता जवळपास तीन महिन्यांच्या वर कालावधी झाला आहे. रशिया आणि यूक्रेनमध्ये तर घमासान लढाई चालू आहे. कधी रशियाचं पारडं जड तर कधी यूक्रेन बलशाली होतो आहे का, रशियावर हावी होतो आहे का असं वाटू लागतं. बातम्या तर अश्या येतआहेत की आता रशिया आण्विक युद्ध सुरू करणार की काय... कोणी म्हणतं रशिया – युक्रेन युद्धाची परिणीती तिसरं महायुद्ध सुरू होण्यात होईल. कोणी म्हणतं आता तर युक्रेनला पाश्चिमात्य देश मदत करत आहेत, म्हणजे अमेरिका आणि तिचे मित्र राष्ट्र युक्रेनला युद्ध सामग्री पुरवत आहेत, त्यामुळे रशिया विरुद्धच युद्ध युक्रेन जिंकेल. हे कमी म्हणून की काय काही दिवसांपूर्वी फिनलंड आणि स्वीडन या देशानी रशियाच्या आव्हानाला घाबरून “आम्हाला नाटोचं सदस्यत्व द्या” अशी मागणी अमेरिकेकडे आणि नाटोकडे केली. अमेरिकेचा तर आनंद गगनात मावेना... जणू काही रशियाविरुद्ध हालचाली करण्याचा मनसुबाच आखला होता. यात भरिस भर म्हणजे तुर्कस्तान नावाच्या देशाने स्वीडन आणि फिनलंड यांच्या नाटो सदस्यत्वाला आम्ही विरोध करू, म्हणजे आम्ही व्हेटो (नकाराधिकार) वापरू आणि फिनलंड आणि स्वीडनला कदापिही ना

तालिबानचे सध्याचे इस्लामी राष्ट्रांबरोबर असलेले संबंध

  तालिबान ... सदध्या अफगाणिस्तानात शरिया कायदा राबवण्याच्या उद्देशाने सत्ता ताब्यात घेणारी संघटना म्हणजे तालिबान... ‘ गुड तालिबान ’ आणि ‘ बॅड तालिबान ’ हा प्रकार अस्तित्वात नाही. जगभर इस्लामी राज्य स्थापन करण्याच्या उद्देशानेच जणू तालिबान आपली पावलं टाकताना दिसतं आहे. जगभर असलेली तथाकथित तज्ञ मंडळी म्हणत आहेत की तालिबान आता बदललं आहे आणि त्यांनी सर्वसमावेशक धोरण ठेवून महिला अन मुलांना समान वागणूक देणार असल्याचं जाहीर केलं आहे पण तसं तालिबानच्या कृतीतून अजिबात दिसत नाही. हा लेख लिहीत असताना ताज्या बातम्यांनुसार तालिबानबद्दल एक बातमी येऊन धडकली आहे. ती म्हटली तर अत्यंत चिंता वाढवणारी आहे आणि एकूणच गंभीरसुद्धा आहे  याचं कारण तालिबानची पावलं ज्या दिशेने पडत आहेत त्यावरून भविष्यात काय होईल याचा थोडा अंदाज बांधता येऊ शकतो. ती बातमी म्हणजे तालिबानच्या एका नेत्याने नुकतच असं म्हटलं आहे की अफगाणिस्तानात दिल्या जाणार्‍या शिक्षा जश्या पूर्वी तालिबान सत्तेवर असताना होत्या तश्याच स्वरुपात त्या परत अफगाणिस्तानात आणल्या जातील. यामध्ये हात पाय तोडणे , दगडाने ठेचून मारणे , तसंच त्यांच्यानुसार गुन्ह