मुख्य सामग्रीवर वगळा

फुटबॉल फक्त निमित्तच !

पाश्चात्य जगात फुटबॉल हा तसा खूपच लोकप्रिय खेळ आणि त्यात युरो कप असेल तर मग फुटबॉल चाहत्यांना एक नामी संधी असते सामना बघायची. हे फुटबॉल सामने १० जून ते १० जुलै २०१६ या काळात फ्रांस मध्ये चालू आहेत. आपल्याकडे मात्र फुटबॉलला ‘अच्छे दिन’ म्हणावे तसे आले नाहीत. याची अनेक कारणे आहेत. पण तो आजचा आपला विषय नाही. असो. जसे आपण क्रिकेटमय वातावरणात जगत असतो, तसेच पाश्चिमात्य जगातील चाहते फुटबॉलमय वातावरणात नेहमी जगत असतात. फुटबॉलचे आणि पाश्चिमात्य जगाचे अतूट नाते आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. राजकीयदृष्ट्या दोन दूर गेलेल्या देशांना जवळ आणण्याची ताकद प्रत्येक खेळात असते तशी ती फुटबॉलमधेही आहे. म्हणजे कुटनीतीपेक्षा भरवश्याचे साधन म्हणजे खेळ! पण खेळाला काहीवेळा अतिउत्साही चाहत्यांकडून गालबोट लागण्याची शक्यातापण असते. फुटबॉल हा खेळ पण याला अपवाद नाही.          


असाच प्रकार इंग्लंड आणि रशिया यांच्यात मार्सेली इथे झालेल्या सामन्याच्या आधी व नंतर घडला. दोन्ही देशांचे चाहते, समर्थक एकमेकांना भिडले. काही रशियन चाहत्यांनी सामन्याच्यावेळी स्टेडीयम मधेच फटके उडवले आणि सामना पाहिला आलेल्या इंग्लिश कुटुंबवत्सल लोकांनासुद्धा मारायला सुरवात केली. तर इकडे रस्त्यावर इंग्लिश फुटबॉल चाहत्यांनी रशियन चाहत्यांना आपले लक्ष्य केले. यात कहर असा कि दोन्ही बाजूच्या चाहत्यांनी खूप राडा घातला आणि छोटेखानी बॉम्ब म्हणून चक्क दारूच्या बाटल्यांचा वापर केला. इतका कि रायट पोलिसांनी फुटबॉल सामन्याच्या आधी आणि सामना चालू असताना दारूची दुकाने बंद ठेवण्याचे फर्मान काढले. या सगळ्या प्रसंगावर फ्रेंच सरकार नाराज असून त्यांनी दोन्ही देशांकडे आपली नाराजी कळवली. तसेच युएफाने (UEFA - युनिअन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन) इंग्लंड आणि रशियाला युरोकप मधून काढून टाकण्याची धमकी दिली. तसं युएफाने आतापर्यंत कधी अशी आक्रमक भूमिका घेतली नव्हती, पण या प्रसंगाचे गांभीर्य पाहता युएफाची भूमिका रास्त आहे असे वाटते. झालेल्या प्रसंगावर फ्रेंच सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचीही भूमिका अत्यंत योग्य आहे असे वाटते. पूर्वी पॅरीस इथे झालेल्या दहशतवादी  हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर फ्रेंच रायट पोलिसांवर अतिरिक्त जबाबदारी येऊन पडली आहे. दहशतवाद्यांचा बिमोड करायला देशभर एकूण नव्वद हजार पोलीस तैनात केले आहेत. हे पोलीस जर त्यांची प्रमुख जबाबदारी सोडून फुटबॉल चाहत्यांना आवरण्याचे काम करू लागले तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी कोणी घ्यायची असा प्रश्न इथे उपस्थित झाला आहे.

फ्रेंच मंत्र्यांनी ही बाब स्पष्ट करताना सांगितले कि दहशतवादाचे सावट असताना फ्रेंच रायट पोलिसांवर अश्या प्रकारच्या चाहत्यांमधल्या हिंसेपोटी अतिरिक्त जबाबदारी येऊन पडते आहे, ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. पोलिसांचे मुख्य काम हे दहशतवादाचा सामना करणे असून, त्यात अश्या प्रकारच्या गंभीर प्रसंगांमुळे त्यांना त्यांचे काम नीट करता येत नाही.

झालेला सगळा प्रकार हा प्रकारे फुटबॉलला काळिमा फासणारा प्रकार आहे. कारण इतके हिंसक स्वरूपाचे हल्ले याआधी कधी झाले नाहीत आणि झाले असतील तरीही त्याची व्याप्ती एवढी मोठी नसावी.

यात प्रामुख्याने सांगण्याजोगी बाब म्हणजे एका बातमीनुसार या हिंसेमध्ये सामील झालेले  रशियन चाहते हे खरे चाहते नसून त्यांच्या टोळ्याच आहेत आणि या टोळ्यांमध्ये रशियन मिलिटरीच्या सैनिकांचा भास होतो आहे. कारण ह्या रशियन टोळ्या विशिष्ट असे युनिफॉर्म घालतात. त्यांच्यामध्ये एक प्रकारची शिस्त आणि संघटन पाहायला मिळते यावरून जणू ते सैनिकांप्रमाणेच आहेत कि काय अशी शंका येते. इंग्लिश चाहतेसुद्धा कमी नाहीत असेच यावरून लक्षात येते. खेळामध्ये हिंसेला स्थान असू नये. नाहीतर त्या खेळाला काय अर्थ उरणार?

रशियन चाह्त्यांबद्दलची बाब जर खरी असेल तर मग गोष्ट दिसते तितकी साधी सोपी नाही. रशियाचे सर्वेसर्वा पुतीन कसे आहेत हे सर्व लोक जाणून आहेत. अमेरिका जिथे कमी पडते तिथे रशियाने जावे अशी पुतीन यांचीच अपेक्षा आहे. जणू रशियाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचे पुण्यकर्मच आपल्याला करावयाचे आहे अश्या थाटात सध्या रशियन सरकार वावरते आहे असे दिसते. सैनिकरूपी चाहत्यांच्या माध्यमातून हे प्रकार करणे अत्यंत चुकीचे आहे, कारण याचा फटका रशियालासुद्धा बसू शकतो जेवढा तो इंग्लंडला बसेल. त्यामुळे फुटबॉल फक्त निमित्त आहे, त्यामागे आंतरराष्ट्रीय राजकारण दडले आहे असा वास येतो आहे. पण निदान खेळात तरी राजकारण नकोच अशी सर्वांचीच अपेक्षा आहे.

-निखील कासखेडीकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंतप्रधान मोदींची अमेरिका भेट

                                    फोटो- गुगलवरुन साभार.    पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 ते 2 4 जून 2023 दरम्यान अमेरिका भेटीवर जात आहेत. ही भेट अधिकृत आहे म्हणजे ज्याला स्टेट व्हिजिट असं म्हणता येईल. ती अश्यासाठी की अमेरिकी अध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी फस्ट लेडी जिल बायडन यांच्या खास आमंत्रणवरून पंतप्रधान मोदी या अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. खरं म्हणजे या स्टेट व्हिजिट या साधारणपणे राष्ट्राच्या प्रमुखांसाठी असतात. इंग्रजीत ज्याला आपण ‘हेड ऑफ द स्टेट’ यांची भेट म्हणू शकतो, म्हणजे भारताच्या राष्ट्रपती या हेड ऑफ द स्टेट आहेत. पण हे प्रथमच होतंय की सरकारचा प्रमुख म्हणजे ‘हेड ऑफ द गवर्नमेंट’ म्हणून पंतप्रधान मोदी अमेरिकेला भेट देणार आहेत. यावरून ही भेट अमेरिकेसाठी किती महत्वाची आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो. पंतप्रधान मोदी सुरवातीला म्हणजे 21 जूनला न्यूयॉर्क इथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी 22 जूनला मोदी हे वॉशिंगटन डी. सी. ला जातील. तिथे पाहुणे म्हणून व्हाईट हाऊसमध्य

तुर्कस्तान, नाटो आणि वादविवाद!

  रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध सुरू होऊन आता जवळपास तीन महिन्यांच्या वर कालावधी झाला आहे. रशिया आणि यूक्रेनमध्ये तर घमासान लढाई चालू आहे. कधी रशियाचं पारडं जड तर कधी यूक्रेन बलशाली होतो आहे का, रशियावर हावी होतो आहे का असं वाटू लागतं. बातम्या तर अश्या येतआहेत की आता रशिया आण्विक युद्ध सुरू करणार की काय... कोणी म्हणतं रशिया – युक्रेन युद्धाची परिणीती तिसरं महायुद्ध सुरू होण्यात होईल. कोणी म्हणतं आता तर युक्रेनला पाश्चिमात्य देश मदत करत आहेत, म्हणजे अमेरिका आणि तिचे मित्र राष्ट्र युक्रेनला युद्ध सामग्री पुरवत आहेत, त्यामुळे रशिया विरुद्धच युद्ध युक्रेन जिंकेल. हे कमी म्हणून की काय काही दिवसांपूर्वी फिनलंड आणि स्वीडन या देशानी रशियाच्या आव्हानाला घाबरून “आम्हाला नाटोचं सदस्यत्व द्या” अशी मागणी अमेरिकेकडे आणि नाटोकडे केली. अमेरिकेचा तर आनंद गगनात मावेना... जणू काही रशियाविरुद्ध हालचाली करण्याचा मनसुबाच आखला होता. यात भरिस भर म्हणजे तुर्कस्तान नावाच्या देशाने स्वीडन आणि फिनलंड यांच्या नाटो सदस्यत्वाला आम्ही विरोध करू, म्हणजे आम्ही व्हेटो (नकाराधिकार) वापरू आणि फिनलंड आणि स्वीडनला कदापिही ना

तालिबानचे सध्याचे इस्लामी राष्ट्रांबरोबर असलेले संबंध

  तालिबान ... सदध्या अफगाणिस्तानात शरिया कायदा राबवण्याच्या उद्देशाने सत्ता ताब्यात घेणारी संघटना म्हणजे तालिबान... ‘ गुड तालिबान ’ आणि ‘ बॅड तालिबान ’ हा प्रकार अस्तित्वात नाही. जगभर इस्लामी राज्य स्थापन करण्याच्या उद्देशानेच जणू तालिबान आपली पावलं टाकताना दिसतं आहे. जगभर असलेली तथाकथित तज्ञ मंडळी म्हणत आहेत की तालिबान आता बदललं आहे आणि त्यांनी सर्वसमावेशक धोरण ठेवून महिला अन मुलांना समान वागणूक देणार असल्याचं जाहीर केलं आहे पण तसं तालिबानच्या कृतीतून अजिबात दिसत नाही. हा लेख लिहीत असताना ताज्या बातम्यांनुसार तालिबानबद्दल एक बातमी येऊन धडकली आहे. ती म्हटली तर अत्यंत चिंता वाढवणारी आहे आणि एकूणच गंभीरसुद्धा आहे  याचं कारण तालिबानची पावलं ज्या दिशेने पडत आहेत त्यावरून भविष्यात काय होईल याचा थोडा अंदाज बांधता येऊ शकतो. ती बातमी म्हणजे तालिबानच्या एका नेत्याने नुकतच असं म्हटलं आहे की अफगाणिस्तानात दिल्या जाणार्‍या शिक्षा जश्या पूर्वी तालिबान सत्तेवर असताना होत्या तश्याच स्वरुपात त्या परत अफगाणिस्तानात आणल्या जातील. यामध्ये हात पाय तोडणे , दगडाने ठेचून मारणे , तसंच त्यांच्यानुसार गुन्ह