मुख्य सामग्रीवर वगळा

आणि दुसरं महायुद्ध संपलं...!

 काही घटना इतिहासात घडून त्यामुळे भूगोल बदलून जातो, आणि मग आज विचार केला तर लक्षात येतं की अश्या घडामोडी इतिहासात कश्या काय घडल्या असतील...कुठलही युद्ध हे मानवी इतिहासातलं सगळ्यात मोठं दाहक वास्तव आहे, जे त्यात्या काळानुसार बदलत गेलं, पण मानवसंहार होत राहिला, याला कारण म्हणजे माणूस प्राण्याची मानसिकता, अजून ज्यास्त प्रमाणात संपत्ती मिळवण्याची लालसा, या सर्व गोष्टी वारंवार घडल्यामुळे आणि शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचं साधन म्हणून, युद्ध, उठाव, बंडखोरी, यादवी या सगळ्या संकल्पना अस्तित्वात आल्या... जिथे मानवी हस्तक्षेप आहे तिथे संघर्ष अटळ आहे, मग तो साम्राज्यासाठी असो, किंवा मिळालेल्या भूभागापैकी असमाधानी राहून, संपत्तीची लालसा ठेवून, किंवा अधिकार गाजवण्यासाठी असो, एकच सत्य आपल्याला समोर वारंवार प्रत्ययास येतं ते म्हणजे, मानवी जीवनात संघर्ष अटळ आहे, तो साम्राज्यासाठी असो, किंवा जमिनीच्या तुकड्यासाठी असो, किंवा मग पैशासाठी असो...


आधुनिक काळात मानव प्राण्याच्या इतिहासात आणि तो सुद्धा 20 व्या शतकात संघर्ष कुठं झाला असेल तर तो पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध यांच्या स्वरूपात झाला. 2 सप्टेंबर म्हणजे आजच्याच दिवशी 1945 ला दुसरं महायुद्ध संपलं अशी अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली, कागदपत्रांवर सह्या झाल्या, आणि मित्र राष्ट्रांनी हा विजय साजरा केला.

दुसरं महायुद्ध चालू झालं ते 1 सप्टेंबर 1939 ला आणि संपुष्टात आलं ते 2 सप्टेंबर 1945 ला. दुसरं महायुद्ध जवळपास 6 वर्ष आणि 1 दिवस चाललं. 20 व्या शतकात इतिहासात जर जागतिक पातळीवर कुठली मोठी घटना घडली असेल तर ती होती दुसरं महायुद्ध. महायुद्धाचे प्रणेते होते, 3 देश, जर्मनी, इटली, आणि जपान... ज्यांच्या बाजूने युद्ध लढलं गेलं, त्या व्यक्ती होत्या अनुक्रमे, जर्मनीचा हिटलर, इटलीचा मुसोलिनी, आणि जपानचा राजा हिरोहितो... हे महायुद्ध 2 गटांमध्ये लढलं गेलं. एकीकडे होते, मित्र राष्ट्र, तर दुसरीकडे होते अक्ष राष्ट्र. एकूण 30 देशांनी दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला... मित्र राष्ट्रांमध्ये सहभागी देश होते, अमेरिका, ब्रिटन, सोव्हिएत महासंघ, फ्रांस, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, चीन. तर दुसऱ्याबाजूला होते जर्मनी, इटली आणि जपान...

हिटलरने पोलंड वर स्वारी केली ती, 1939 मध्ये. पोलंडचा भूभाग नंतर जिंकल्यानंतर वाटून घेतला तो जर्मनी आणि तेंव्हाच्या रशियाने. ब्रिटन आणि फ्रांस यांचं जर्मनी आणि इटली बरोबर युद्ध झालं. 1940 ला फ्रांसचा पाडाव झाला. इकडे जपानने चीन विरुद्ध युद्ध आधीच सुरु केलं होतं, त्यामुळे जपान आपोआपच युद्धात सामील झाला. जपानने पर्ल हार्बर या अमेरिकी मिलिटरी बेसवर हल्ला चढवला, म्हणून आता तर अमेरिका सुद्धा युद्धात उतरली. युद्ध हे बर्याचश्या ठिकाणी लढलं गेलं, यात समावेश होता तो प्रामुख्याने युरोप, आफ्रिका आणि आशिया खंडातल्या देशांचा आणि त्यांच्या भूभागांचा. या दरम्यान भीषण असा मानावसंहार झाला. एकूण लष्करी आणि सामान्य नागरिक मिळून 7 कोटींच्या आसपास लोक मारले गेले. 1942 पर्यंत युद्धामध्ये जर्मनीचं पारडं जाड होतं, आणि अक्ष राष्ट्र युद्ध जिंकणार असं वाटत होत, पण जर्मनीने राशियाविरुद्ध युद्ध पुकारल्यावर स्टालिनग्राड इथल्या अटीतटीच्या लढाईत जर्मनी मागे पडला. पुढे जाऊन तर जर्मनी आणि इटली यांनी शरणागती पत्करली तरीसुद्धा जपान मात्र मागे राहायला तयार नव्हता. जपानने सांगितलं की आम्ही मित्र राष्ट्रांबरोबर युद्द चालूच ठेवू... झालं! या नंतर साऱ्या मानवी जगाच्या इतिहासात ज्याची काळ्या अक्षराने नोंद झाली त्या घटना घडल्या. जपान शरण जात नाही, हे कळल्यावर अमेरिकेने जपान विरुद्ध अणुबॉम्ब वापरायचं ठरवलं. रशियाच्या स्टालिनने याला मूकसंमती दिली. मानवी इतिहासात न भूतो न भविष्यती अश्या स्वरूपाचा मानवसंहार समोर दिसत होता. अमेरिकेने 6 ऑगस्टला हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब टाकला... आणि लगेच 2 दिवसांनी म्हणजे 9 ऑगस्टला दुसरा अणुबॉम्ब नागासाकीवर टाकला. जणू अनेक सूर्य एकाच वेळी प्रज्वलित झाले की काय असंच वाटावं इतकी प्रखर ऊर्जा आणि प्रकाश अणुबॉम्ब टाकल्यानंतर पाहायला मिळाला.
जपानने अजून अणुबॉम्ब पडतील या भीतीने तसंच रशियाच्या युद्धतल्या प्रवेशामुळे माघार घेऊन शरणागती पत्करली. जपानने 2 सप्टेंबर 1945 ला USS Missouri या अमेरिकेच्या युद्धनौकेवर कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या आणि अधिकृतरित्या महायुद्ध संपल्याची घोषणा करण्यात आली.
यानंतर जागतिक समीकरण बदलली. अमेरिका आणि सोव्हिएत रशियामध्ये शीतयुद्ध चालू झालं, युरोप युद्धातून परत उभा राहिला... जपानने आर्थिक, सामाजिक आणि राजकीय स्तरांवर मोठी झेप घेतली. अमेरिका महासत्ता झाली, सोव्हिएत रशियाचे विघटन झालं... हे सगळं होऊनसुद्धा दुसऱ्या महायुद्धचा परिणाम खूप मोठा झाला. पहिल्यांदाच अणुबॉम्बच्या वापरामुळे, साऱ्या जगाला धास्ती वाटली ती म्हणजे दोन देशांमध्ये जर युद्ध झालं आणि त्यात अणुबॉम्ब वापरला गेला तर काय होईल, याची झलक जपानवर अणुबॉम्ब टाकून जगाने अनुभवली होती...
अनेक देश स्वतंत्र झाले, आंतराष्ट्रीय संघटना स्थापन झाल्या, आणि एका नव्या दिशेने नव्या जगाची वाटचाल शांततेकडे सुरु झाली. पण यातून अनेक नवीन प्रश्न उभे राहिले, त्याबद्दल परत कधीतरी...!

- निखिल कासखेडीकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

  ‘ टोंगा ’ हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया , मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. या राज्यावर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती , १९७० पर्यन्त... त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला ... हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण विशेष असं सांगण्यासारखं १५ जानेवारी २०२२ पर्यन्त असं काही नव्हतं. पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या ‘ हुंगा टोंगा हुंगा हापाई ’ या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला टोंगा हे नाव माहीत झालं. या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं , असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली... पाण्याने प्रदेश व्य...

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

आधुनिक व्यापारातील संकल्पना -

  मुक्त व्यापार. व्यापारातील संरक्षणाच्या पद्धतीच्या बरोबर विरुद्ध प्रकार म्हणजे मुक्त व्यापार. आणि हो आज मुक्त व्यापाराचा सगळीकडे बोलबाला आहे. अनेक अभ्यासक, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक तसेच अनेक तज्ञ लोकांनी या मुक्त व्यापार संकल्पनेला संमती दर्शवली आहे. या मुक्त व्यापार संकल्पनेचा अनेकांनी उहापोह केला आहे, आणि सगळ्याचं एकमत असं झालं कि हीच व्यापार पद्धती सर्वसमावेशक आणि सर्व देशांच्या हिताची आहे. एवढच काय तर जागतिक व्यापार संघटना या मुक्त व्यापार संकल्पनेला बांधील आहे. त्यांच्या अजेन्ड्यामध्ये दोन किंवा अधिक देशांचा एकमेकांशी मुक्त व्यापार ह्या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे. एक गोष्ट मान्य करायला पाहिजे कि आज जगात मुक्त व्यापारचे समर्थक मोठ्या संखेने आहेत, त्याच्या तुलनेत व्यापाराला संरक्षण द्या असे म्हणणारे खूप कमी आहेत. खरं असं म्हणायला काहीच हरकत नाही कि मुक्त व्यापारावर सगळ्याचं एकमत आहे. मुक्त व्यापाराची काही खास अशी वैशिष्टे आहेत. व्यापारातील संरक्षण या संकल्पनेत ज्या काही गोष्टींचा अंतर्भाव केला आहे अगदी त्याच्या सगळ्या उलट गोष्टींचा स्वीकार मुक्त व्यापारात केला आहे. उदाह...