मुख्य सामग्रीवर वगळा

पाकिस्तान अमेरिका संबंध... दुरावलेलेच!

दोन सच्च्या मित्रांची जशी मैत्री असते तशीच किंवा अगदी त्याहून ज्यास्त मैत्री पाकिस्तानची अमेरिकेबरोबर होती. इथे होती असं म्हणण्याचं कारण म्हणजे पाकिस्तान अमेरिका संबंध २०११ पासून तणावपूर्ण आहेत. याला काही आंतरराष्ट्रीय तसेच काही प्रादेशिक कारणं देखील आहेत.

पाकिस्तान अमेरिका संबंध – पार्श्वभूमी

वास्तविक पाहता अमेरिका हा काही निवडक देशांपैकी एक देश होता, ज्याने पाकिस्तान स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित झाल्यानंतर त्याला मान्यता दिली. पाकिस्तान बरोबर अमेरिकेचे संबंध पुढील काळात वृद्धिंगत होत गेले. पाकिस्तानमधल्या पाकिस्तान मुस्लीम लीग या पक्षाच्या अमेरिका धार्जिण्या धोरणामुळे अमेरिका आणि पाकिस्तान या दोन देशांमधले संबंध सुदृढ झाले. याला पाकिस्तान मुस्लीम लीगचे भांडवलवादी धोरण मुख्यत्वेकरून कारणीभूत ठरले.



शीतयुद्ध सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत अमेरिकेला पाकिस्तानची सोबत होती. सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानमध्ये मोर्चा प्रस्थापित केला. आपले सैन्य पाठवले. इकडे अमेरिका जागी झाली. अमेरिकेला पाकिस्तानबद्दल चिंता वाटू लागली. जर सोव्हियेत रशियाने पाकिस्तानमध्ये सैन्य घुसवले आणि हल्ला केला तर काय करायचं? हा प्रश्न सतत अमेरिकेच्या डोळ्यासमोर होता. यामुळे अमेरिकेचा पाकिस्तानला मिळणारा पाठिंबा अजूनच वाढला. पण त्या आधीचा काळ हा पाकिस्तान अमेरिका संबंधांची परीक्षा पाहणारा ठरला. १९६५  साली जेंव्हा भारताबरोबर झालेल्या युद्धात पाकिस्तान हरला, त्यावेळी अमेरिकेने पाकिस्तानवर शस्त्रास्त्र निर्बंध लादले. याचे कारण फारच विचित्र होते. अमेरिकेने दिलेली शस्त्रास्त्रे पाकिस्तानी सैनिकांना युद्धात नीट वापरता आली नाहीत आणि म्हणून निर्बंध लादले, असं कारण अमेरिकेने दिले.

पुढे म्हणजे १९७९ साली अमेरिकच्या सी. आय. ए. ला खात्रीशीर समजले कि, पाकिस्तान आण्विक कार्यक्रम हाती घेतो आहे, अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर अमेरिकेच्या कार्टर प्रशासनाने ‘सिमिंगटन अमेंडमेंट’ लागू केले. या अमेंडमेंट नुसार पाकिस्तानला अमेरिकेकडून कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत मिळण्यापासून रोखलं गेलं. यातच १९८५ साली अमेरिकी सभागृहात ‘प्रेसलर अमेंडमेंट’ पारित करण्यात आलं. यानुसार सैल सुटलेल्या पाकिस्तानने अमेरिकेकडून मिळणारी आर्थिक मदत आण्विक कार्यक्रम चालू ठेवण्यासाठी वापरू नये यासाठी अनेक कलमं अंतर्भूत करण्यात आली. इथे पाकिस्तान अमेरका संबंध ताणले गेले.



पण शीतयुद्धाच्या काळात आणि २००१ सालानंतर पाकिस्तान अमेरिकेच्या अजून जवळ आला. शीतयुद्धात सोव्हिएत रशियाविरुद्ध अमेरिकेने पाकिस्तानला पाठींबा दिला. २००१ ला वर्ल्ड ट्रेड सेंटर वर हल्ला झाल्यानंतर अमेरिकी अध्यक्ष धाकट्या बुश साहेबांनी ‘वॉर ऑन टेरर’ घोषित केल्यानंतर अमेरिकेला अल कायदाचे तळ उध्वस्त करण्यासाठी पाकिस्तानची मदत खूपच आवश्यक वाटली. यानंतर जसे जसे पाकिस्तानला अमेरिकी अर्थसहाय्य झाले तसे तसे ती मदत पाकिस्तानने भारताविरोधात वापरली.

२०११ नंतरचे पाकिस्तान अमेरिका संबंध -

२०१० चे दशक पाकिस्तान अमेरिका संबंधांसाठी संमिश्र गेलं. या दोन देशांच्या संबंधांना २०११ पासून उतरती कळा लागली ती आजतागायत चालू आहे. २०११ साली पाकिस्तान अमेरिका संबंधाना प्रतिकूल ठरणाऱ्या तीन घटना घडल्या. एक म्हणजे पाकिस्तानातल्या अबोटाबाद इथे अमेरिकेच्या नेव्ही सील्सने ओसामा बिन लादेनचा त्याच्याच घरात शिरून खात्मा केला. या ऑपरेशनला नाव देण्यात आले, ‘ऑपरेशन नेपच्यून स्पियर’! यात अमेरिकी नौदलाच्या सिल्सनी चार हेलीकॉप्टर सकट ओसामाच्या घराच्या कंपाऊंड मध्ये उतरून त्याच्यावर हल्ला चढवला. ही कारवाई इतक्या गुप्तपद्धतीने करण्यात आली की ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतरसुद्धा पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना याची माहिती नव्हती. अबोटाबाद पासून जवळच पाकिस्तानचा एक हवाई दलाचा तळ आहे, तिथेसुद्धा या कारवाईचा थांगपत्ता लागला नाही, असे पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांत कटुता आली. दुसरी घटना घडली, ती म्हणजे रेमंड डेव्हीस या अमेरिकेच्या सैनिकाने पाकिस्तानात दोन शस्त्रधारी लोकांना ठार मारले. त्याच्यावर मनुष्यवधाचा खटला चालला आणि त्यातून तो निर्दोष सुटला. तिसरी घटना होती, नाटोच्या सैनिकांनी अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमारेषेनजिक पाकिस्तानी सैनिकांवर केलेल्या हल्ल्याची. ही घटना ‘सलाला इंसिडंट’ म्हणून ओळखली जाते. अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमारेषे नजिक पाकिस्तानचे दोन चेकपोस्ट होते, त्यावर नाटोच्या सैनिकांनी हल्ला चढवला. यात हेलीकॉप्टर्स सुद्धा वापरली गेली. या हल्ल्यात पाकिस्तानचे २८ सैनिक ठार झाले. या तीन घटनांनी पाकिस्तान अमेरिका संबंधांमध्ये खूपच दुरावा आला.

सध्या अमेरिकेचे संरक्षण सचिव जेम्स मॅटीस पाकीस्तान दौऱ्यावर आले आहेत. पाकिस्तानने जे दहशतवादी त्यांच्या देशाची भूमी अफगाणिस्तानमध्ये हल्ल्यासाठी वापरात आहेत अशांचा बंदोबस्त करावा यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे, हे सांगण्यासाठी मॅटीस पाकिस्तानात आले आहेत अशी बातमी रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे. नुकतच सी. आय. ए. प्रमुख माईक पाम्पेओ यांनी एका कार्यक्रमात बोलताना एक विधान केले. ते म्हणाले, पाकिस्तानने त्वरित जे दहशतवादी पाकिस्तानी जमीन वापरून शेजारच्या अफगाणिस्तानमध्ये हल्ले करत आहेत, त्यांना पाकिस्तानने पायबंद घालावा, असे न केल्यास अमेरिका अश्या दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतः पाकिस्तानात घुसुन कारवाई करेल आणि त्यांचे तळ उध्वस्त करेल. खरे तर हा इशाराच आहे पाकिस्तानला.

ट्रम्प प्रशासन, पाकिस्तान आणि भविष्य-

डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर, पाकिस्तानविरोधात ट्रम्प प्रशासनाने जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. याला भारत अमेरिका संबंध दृढ होण्याची पार्श्वभूमीसुद्धा आहे. ट्रम्प आणि मोदी यांची मैत्री भारत अमेरिका संबंधाना बळकटी देणारी असल्यामुळे, पाकिस्तान चिंतेत आहे. नुकताच हाफिज सईदची पुराव्या अभावी नजरकैदेतून मुक्तता झाल्यानंतर भारताने त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच अमेरिकेने पाकिस्तानला दम भरला आणि नाराजी व्यक्त केली. याचा दबाव म्हणून की काय पाकिस्तानने हाफिज सईदला पुन्हा नजरकैदेत ठेवले आहे. मुंबईत झालेल्या २६ नोव्हेंबर २००८ सालच्या हल्ल्याचा मास्टरमाइंड म्हणून हाफिज सईदचे नाव घेतले जाते.



एकूणच पाकिस्तान अमेरिका संबंध पूर्वी बहरले जरी असले तरीसुद्धा आता मात्र अमेरिकेचा विश्वास पाकिस्तान गमावून बसला आहे, अशी परीस्थिती आहे. अगदी पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून केवळ भारताविरुद्ध पूर्वग्रहदुषित दृष्टीकोण आणि सोव्हिएत रशियाचा हस्तक म्हणून अमेरिकेने भारताची आतापर्यंत हेटाळणी केली. यात भारताला आणि पाकिस्तानला समान वागणूक देण्याचे अमेरिकेचे धोरण सुद्धा भारताबरोबर संबंधांमध्ये कटुता येण्याचे कारण होते. भारताने वारंवार पाकिस्तानच्या कुरापत्यांबद्दल सांगूनसुद्धा अमेरिकेने पाकिस्तानलाच मित्र मानले. मात्र अलीकडच्या काळात या धोरणात बदल झाला. जसा जसा भारत अमेरिकेच्या जवळ गेला तसा तसा पाकिस्तान अमेरिकेच्या दूर गेला आहे. ही आजची स्थिती आहे. येणाऱ्या काळात पाकिस्तान अमेरिका संबंध सुधारतील आणि अमेरिका पाकिस्तानला भारताविरुद्ध हल्ले करण्यापासून रोखेल अशी अपेक्षाच तेवढी आहे. पाकिस्तानने योग्य धडा घेतला तर ठीकच, अन्यथा पाकिस्तानविरोधात अमेरिका आक्रमक धोरण राबवील असा अंदाज आहे. पाकिस्तान अमेरिका संबंध सुधरवण्यासाठी ट्रम्प प्रशासन काय पावलं उचलते ते येणारा काळच सांगेल. पण असं जरी असलं तरीसुद्धा दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेचा गमावलेला विश्वास परत आणण्यासाठी धाडसी निर्णय घेणे आवश्यक आहे.

-निखील कासखेडीकर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंतप्रधान मोदींची अमेरिका भेट

                                    फोटो- गुगलवरुन साभार.    पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 ते 2 4 जून 2023 दरम्यान अमेरिका भेटीवर जात आहेत. ही भेट अधिकृत आहे म्हणजे ज्याला स्टेट व्हिजिट असं म्हणता येईल. ती अश्यासाठी की अमेरिकी अध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी फस्ट लेडी जिल बायडन यांच्या खास आमंत्रणवरून पंतप्रधान मोदी या अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. खरं म्हणजे या स्टेट व्हिजिट या साधारणपणे राष्ट्राच्या प्रमुखांसाठी असतात. इंग्रजीत ज्याला आपण ‘हेड ऑफ द स्टेट’ यांची भेट म्हणू शकतो, म्हणजे भारताच्या राष्ट्रपती या हेड ऑफ द स्टेट आहेत. पण हे प्रथमच होतंय की सरकारचा प्रमुख म्हणजे ‘हेड ऑफ द गवर्नमेंट’ म्हणून पंतप्रधान मोदी अमेरिकेला भेट देणार आहेत. यावरून ही भेट अमेरिकेसाठी किती महत्वाची आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो. पंतप्रधान मोदी सुरवातीला म्हणजे 21 जूनला न्यूयॉर्क इथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी 22 जूनला मोदी हे वॉशिंगटन डी. सी. ला जातील. तिथे पाहुणे म्हणून व्हाईट हाऊसमध्य

तुर्कस्तान, नाटो आणि वादविवाद!

  रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध सुरू होऊन आता जवळपास तीन महिन्यांच्या वर कालावधी झाला आहे. रशिया आणि यूक्रेनमध्ये तर घमासान लढाई चालू आहे. कधी रशियाचं पारडं जड तर कधी यूक्रेन बलशाली होतो आहे का, रशियावर हावी होतो आहे का असं वाटू लागतं. बातम्या तर अश्या येतआहेत की आता रशिया आण्विक युद्ध सुरू करणार की काय... कोणी म्हणतं रशिया – युक्रेन युद्धाची परिणीती तिसरं महायुद्ध सुरू होण्यात होईल. कोणी म्हणतं आता तर युक्रेनला पाश्चिमात्य देश मदत करत आहेत, म्हणजे अमेरिका आणि तिचे मित्र राष्ट्र युक्रेनला युद्ध सामग्री पुरवत आहेत, त्यामुळे रशिया विरुद्धच युद्ध युक्रेन जिंकेल. हे कमी म्हणून की काय काही दिवसांपूर्वी फिनलंड आणि स्वीडन या देशानी रशियाच्या आव्हानाला घाबरून “आम्हाला नाटोचं सदस्यत्व द्या” अशी मागणी अमेरिकेकडे आणि नाटोकडे केली. अमेरिकेचा तर आनंद गगनात मावेना... जणू काही रशियाविरुद्ध हालचाली करण्याचा मनसुबाच आखला होता. यात भरिस भर म्हणजे तुर्कस्तान नावाच्या देशाने स्वीडन आणि फिनलंड यांच्या नाटो सदस्यत्वाला आम्ही विरोध करू, म्हणजे आम्ही व्हेटो (नकाराधिकार) वापरू आणि फिनलंड आणि स्वीडनला कदापिही ना

तालिबानचे सध्याचे इस्लामी राष्ट्रांबरोबर असलेले संबंध

  तालिबान ... सदध्या अफगाणिस्तानात शरिया कायदा राबवण्याच्या उद्देशाने सत्ता ताब्यात घेणारी संघटना म्हणजे तालिबान... ‘ गुड तालिबान ’ आणि ‘ बॅड तालिबान ’ हा प्रकार अस्तित्वात नाही. जगभर इस्लामी राज्य स्थापन करण्याच्या उद्देशानेच जणू तालिबान आपली पावलं टाकताना दिसतं आहे. जगभर असलेली तथाकथित तज्ञ मंडळी म्हणत आहेत की तालिबान आता बदललं आहे आणि त्यांनी सर्वसमावेशक धोरण ठेवून महिला अन मुलांना समान वागणूक देणार असल्याचं जाहीर केलं आहे पण तसं तालिबानच्या कृतीतून अजिबात दिसत नाही. हा लेख लिहीत असताना ताज्या बातम्यांनुसार तालिबानबद्दल एक बातमी येऊन धडकली आहे. ती म्हटली तर अत्यंत चिंता वाढवणारी आहे आणि एकूणच गंभीरसुद्धा आहे  याचं कारण तालिबानची पावलं ज्या दिशेने पडत आहेत त्यावरून भविष्यात काय होईल याचा थोडा अंदाज बांधता येऊ शकतो. ती बातमी म्हणजे तालिबानच्या एका नेत्याने नुकतच असं म्हटलं आहे की अफगाणिस्तानात दिल्या जाणार्‍या शिक्षा जश्या पूर्वी तालिबान सत्तेवर असताना होत्या तश्याच स्वरुपात त्या परत अफगाणिस्तानात आणल्या जातील. यामध्ये हात पाय तोडणे , दगडाने ठेचून मारणे , तसंच त्यांच्यानुसार गुन्ह