मुख्य सामग्रीवर वगळा

आंतरराष्ट्रीय संबंधाविषयी थोडेसे...

'आंतरराष्ट्रीय संबंध' हा एक अभ्यासाचा अफलातून विषय आहे, ज्यात जागतिक पातळीवर दोन देशांचा किंवा अनेक देशांचे एकमेकांशी असलेले नाते अभ्यासणे हा प्रमुख घटक मानला जातो. आज अनेक देशांना मुलभूत समस्या भेडसावत आहे, लोकसंख्या प्रश्न आहे, बेरोजगारी आहे, शुद्ध पाणी मिळण्याची समस्या आहे. दुसरीकडे दहशतवाद, तसेच मूलतत्ववाद्यांचा धोका सा-या मानवतेला जाणवू लागला आहे. अनेक         मूलतत्ववादी संघटना आजमितीला संपूर्ण जगावर कब्जा करण्यासाठी जणू वाट पाहत आहे. अश्या परिस्थितीमध्ये या सर्व समस्यांची उकल करणे हे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये अपेक्षित आहे आणि गरजेचं पण आहे.


वरील सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी, त्यातून मार्ग काढून हे प्रश्न परत उद्भवणार नाहीत यासाठी जागतिक पातळीवर अनेक मोठ्या सरकारी, बिन सरकारी, किंवा ज्याला आपण IGO's म्हणू शकतो अश्या सर्व प्रकारच्या संघटना त्यात्या ठरवून दिलेल्या क्षेत्रात काम करत आहे. यात सगळ्यात महत्वाची संघटना जिचा उल्लेख करणे अनिवार्य आहे ती म्हणजे संयुक्त राष्ट्रे किंवा संयुक्त राष्ट्र संघटना.  मुख्यत: राजकीय विषय या संघटने मध्ये हाताळले जातात. दोन देशांमध्ये सुसंवाद प्रस्थापित करणे, शांततातामय मार्गाने प्रश्न सोडवणे, मानवी अधिकारांचे संरक्षण तसेच इतर विषय यात आर्थिक, सामाजिक हे सुद्धा सोडवले जातात. यात सुद्धा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद हि अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. सर्व सदस्य देशांचे प्रतिनिधी या सुरक्षा परिषदेत भाग घेतात.

दुस-या महायुद्धानंतर जगाला एका व्यापक संघटनेची गरज वाटू लागली, कारण अत्यंत भयंकर अश्या दोन महायुद्ध पाहिलेल्या आधुनिक जगाला शांततेसाठी एका अश्या आंतरराष्ट्रीय संघटनेची गरज होती कि जी या उध्वस्त जगाची पुनर्रचना करून एका वैभवशाली समृद्ध उद्याकडे वाटचाल करू शकेल आणि यातूनच संयुक्त राष्ट्रांचा जन्म झाला.


संयुक्त राष्ट्रांप्रमाणे आज जागतिक व्यापारासाठी संबंधित जागतिक व्यापार संघटना आहे, एका विशाल युरोपचं स्वप्न पाहणारी 'युरोपीयन युनिअन' हि संघटना कार्यरत आहे. याशिवाय जागतिक स्तरावर विविध देशांना सुकर होईल अश्या पद्धतीने कर्ज व पतपुरवठा करणारी जागतिक बँक आहे. आज समस्या अनेक आहेत, पण त्याला पुरून उरणा-या अशा भरभक्कम संघटनाही आहेत. यात अनेक तज्ञ लोक काम करत आहे. जिथे अनेक देशांना समस्या सोडवण्यामध्ये अडचणी येतात, तिथे या जागतिक संघटना जबाबदारी घेऊन, आपले तज्ञ मंडळी कामाला लावून, एक व्यापक संरचना उभी करून त्यातून मार्ग काढतात.



अनेक देशांमध्ये पश्चिमेकडच्या राष्ट्रांमध्ये 'थिंक टँक' ही एक संकल्पना आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे जागतिक स्तरावर अनेक संघटना अनेक प्रश्न सोडवण्यासाठी सज्ज असल्या तरी यश मिळणे हे त्या वेळेच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. मग अश्या वेळी जर देशांची सरकारे प्रयत्नात कमी पडली किंवा या आंतरराष्ट्रीय सरकारी संघटनांना यश मिळाले नाही तर काय? यासाठी मुख्यत्वेकरून  सरकारला सल्ला देण्यासाठी आणि एक ठोस मजबूत उपाय योजण्यासाठी काही मोजकेच पण त्या त्या विषयात तज्ञ असलेले लोक एकत्रितपणे एका संस्थेच्या माध्यमातून सरकारला साहाय्य करतात. अश्या संस्थाना 'थिंक टँक' म्हणतात. भारतामध्ये हि संकल्पना अजून प्राथमिक अवस्थेमध्ये आहे.



आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये, परराष्ट्र धोरणामध्ये, वाटाघाटी आणि चर्चा ही प्रमुख अस्त्र आहेत आणि अगदीच प्रश्न नाही सुटला, तर मग सैनिकी कारवाई करणे हे क्रमप्राप्त आहे. पण एक गोष्ट अशी कि या सैनिकी कारवाईमुळेच त्याचे रुपांतर मोठ्या युद्धात होण्याचा संभव असतो.

पण एकूणच क्लिष्ट आणि सोप्या समस्या सोडवण्याचं काम आंतरराष्ट्रीय संबंध सारखा विषय करतो हे मात्र 
निश्चित. संपूर्ण मानवतेला एका योग्य दिशेनं मार्गक्रमण करण्यासाठी जणू ह्या विषयाचं योगदान आहे. असा 
हा विषय जाणून घेणे म्हणजे जगाची सफर करण्याइतकं मनोरंजक आहे आणि एका अर्थाने व्यापक पण आहे.

टिप्पण्या

  1. मस्त निखील....
    सध्या यासंघटनांचा मुख्य उद्देश मध्य पूर्व याआशियात शांतता कशी प्रस्थापित करता येईल हा आहे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. खूप धन्यवाद निनाद! तुझ अगदी बरोबर आहे. खासकरून संयुक्त राष्ट्र हि संघटना मध्य पूर्व आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी रायात्नशील आहे. सध्या सिरीया मध्ये ज्या पद्धतीने गृह युद्ध चालू आहे ते पाहता सुरक्षा परिषद हा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी बांधील आहे. संयुक्त राष्ट्रात अमेरिका आणि मित्र देशांचा बोलबाला असल्यामुळे त्यादृष्टीने अमेरिका काय पद्धतीने पावले उचलते आणि मध्य पूर्व आशिया मधल्या कुठल्या देशांना हाताशी घेते हा खरा मुद्दा आहे. सिरीया बरोबरच सौदी अरेबिया आणि इराण यांच्यात जणू काही छुपे युद्ध चालू असल्यासारखी परिस्थिती आहे, म्हणून अशांत मध्य पूर्व आशिया शांत करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे.

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंतप्रधान मोदींची अमेरिका भेट

                                    फोटो- गुगलवरुन साभार.    पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 ते 2 4 जून 2023 दरम्यान अमेरिका भेटीवर जात आहेत. ही भेट अधिकृत आहे म्हणजे ज्याला स्टेट व्हिजिट असं म्हणता येईल. ती अश्यासाठी की अमेरिकी अध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी फस्ट लेडी जिल बायडन यांच्या खास आमंत्रणवरून पंतप्रधान मोदी या अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. खरं म्हणजे या स्टेट व्हिजिट या साधारणपणे राष्ट्राच्या प्रमुखांसाठी असतात. इंग्रजीत ज्याला आपण ‘हेड ऑफ द स्टेट’ यांची भेट म्हणू शकतो, म्हणजे भारताच्या राष्ट्रपती या हेड ऑफ द स्टेट आहेत. पण हे प्रथमच होतंय की सरकारचा प्रमुख म्हणजे ‘हेड ऑफ द गवर्नमेंट’ म्हणून पंतप्रधान मोदी अमेरिकेला भेट देणार आहेत. यावरून ही भेट अमेरिकेसाठी किती महत्वाची आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो. पंतप्रधान मोदी सुरवातीला म्हणजे 21 जूनला न्यूयॉर्क इथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी 22 जूनला मोदी हे वॉशिंगटन डी. सी. ला जातील. तिथे पाहुणे म्हणून व्हाईट हाऊसमध्य

तुर्कस्तान, नाटो आणि वादविवाद!

  रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध सुरू होऊन आता जवळपास तीन महिन्यांच्या वर कालावधी झाला आहे. रशिया आणि यूक्रेनमध्ये तर घमासान लढाई चालू आहे. कधी रशियाचं पारडं जड तर कधी यूक्रेन बलशाली होतो आहे का, रशियावर हावी होतो आहे का असं वाटू लागतं. बातम्या तर अश्या येतआहेत की आता रशिया आण्विक युद्ध सुरू करणार की काय... कोणी म्हणतं रशिया – युक्रेन युद्धाची परिणीती तिसरं महायुद्ध सुरू होण्यात होईल. कोणी म्हणतं आता तर युक्रेनला पाश्चिमात्य देश मदत करत आहेत, म्हणजे अमेरिका आणि तिचे मित्र राष्ट्र युक्रेनला युद्ध सामग्री पुरवत आहेत, त्यामुळे रशिया विरुद्धच युद्ध युक्रेन जिंकेल. हे कमी म्हणून की काय काही दिवसांपूर्वी फिनलंड आणि स्वीडन या देशानी रशियाच्या आव्हानाला घाबरून “आम्हाला नाटोचं सदस्यत्व द्या” अशी मागणी अमेरिकेकडे आणि नाटोकडे केली. अमेरिकेचा तर आनंद गगनात मावेना... जणू काही रशियाविरुद्ध हालचाली करण्याचा मनसुबाच आखला होता. यात भरिस भर म्हणजे तुर्कस्तान नावाच्या देशाने स्वीडन आणि फिनलंड यांच्या नाटो सदस्यत्वाला आम्ही विरोध करू, म्हणजे आम्ही व्हेटो (नकाराधिकार) वापरू आणि फिनलंड आणि स्वीडनला कदापिही ना

तालिबानचे सध्याचे इस्लामी राष्ट्रांबरोबर असलेले संबंध

  तालिबान ... सदध्या अफगाणिस्तानात शरिया कायदा राबवण्याच्या उद्देशाने सत्ता ताब्यात घेणारी संघटना म्हणजे तालिबान... ‘ गुड तालिबान ’ आणि ‘ बॅड तालिबान ’ हा प्रकार अस्तित्वात नाही. जगभर इस्लामी राज्य स्थापन करण्याच्या उद्देशानेच जणू तालिबान आपली पावलं टाकताना दिसतं आहे. जगभर असलेली तथाकथित तज्ञ मंडळी म्हणत आहेत की तालिबान आता बदललं आहे आणि त्यांनी सर्वसमावेशक धोरण ठेवून महिला अन मुलांना समान वागणूक देणार असल्याचं जाहीर केलं आहे पण तसं तालिबानच्या कृतीतून अजिबात दिसत नाही. हा लेख लिहीत असताना ताज्या बातम्यांनुसार तालिबानबद्दल एक बातमी येऊन धडकली आहे. ती म्हटली तर अत्यंत चिंता वाढवणारी आहे आणि एकूणच गंभीरसुद्धा आहे  याचं कारण तालिबानची पावलं ज्या दिशेने पडत आहेत त्यावरून भविष्यात काय होईल याचा थोडा अंदाज बांधता येऊ शकतो. ती बातमी म्हणजे तालिबानच्या एका नेत्याने नुकतच असं म्हटलं आहे की अफगाणिस्तानात दिल्या जाणार्‍या शिक्षा जश्या पूर्वी तालिबान सत्तेवर असताना होत्या तश्याच स्वरुपात त्या परत अफगाणिस्तानात आणल्या जातील. यामध्ये हात पाय तोडणे , दगडाने ठेचून मारणे , तसंच त्यांच्यानुसार गुन्ह