मुख्य सामग्रीवर वगळा

ट्रॅफिक जॅम – सुएझ कालवा...

 23 मार्चला इजिप्तच्या सुएझ कालव्यात एव्हरग्रीन मरीन या तैवानच्या कंपनीचं एवर गिव्हन हे मालवाहू जहाज सुएझ कालवा पार करत असताना अडकून पडलं. ते जमिनीत रूतलं आणि ते अश्या पद्धतीने अडकून पडलं की दोन्ही बाजूनी येणार्‍या आणि जाणार्‍या मालवाहू जहाजांचा रस्ताच बंद झाला. यामुळे जलवाहतुकीवर परिणाम होऊन साधारणत: तीनशे मालवाहू जहाजं अडकून पडली आहेत. यामुळे खूप मोठं आर्थिक नुकसान जगाला झेलावं लागत आहे. तासाला 400 मिलियन डॉलर्स, तर दिवसाला 9.6 बिलियन डॉलर्स एवढं आर्थिक नुकसान होत आहे. 14 टग बोटी हे जहाज परत पाण्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत, याचं कारण, ते जहाज मातीत रूतलं आहे.



काही बातम्यांनुसार यामुळे संपूर्ण जलवाहतुकीबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. याचं कारण असं आहे की, तज्ञांनी सांगितल्यानुसार सध्याच्या काळातली मालवाहू जहाज कमी कर्मचारी वर्ग, कमी जागेत खूप माल भरणे आणि कमी स्किल असलेला कर्मचारी वर्ग या सर्व गोष्टींमुळे जलवाहतुकीच्या क्षेत्रावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. ‘एवर गिव्हन’ या जहाजाबद्दल बोलायचं झाल्यास मालवाहू जहाजाचा कर्मचारी वर्ग हा भारतीय आहे. हे कर्मचारी-अधिकारी मिळून 25 लोक या जहाजावर आहेत. जहाजाच्या कंपनीनुसार हे जहाज वादळी वार्‍यांमुळे आणि मोठ्या लाटांमुळे भरकटत जाऊन सुएझ कालव्यात अडकले. पण तज्ञानुसार मार्गातून जात असताना जहाजाचा वेग हा 8 नॉटिकल माइल्स इतका असायला होता, पण प्रत्यक्ष त्याचा वेग हा 30 नॉटिकल माइल्स एवढा होता, याचं कारण कंपनीकडून सांगण्यात आलं की मोठ्या लाटा असल्यामुळे ते अडकून पडायला नको म्हणून त्या जहाजाचा वेग वाढवण्यात आला. याबरोबर दुसरं कारण म्हणजे तज्ञानुसार, दहा वर्षापूर्वी 10000 कंटेनर वाहून नेणारी मालवाहू जहाज होती, पण आता एव्हर गिव्हन या जहाजाचं उदाहरण घेतल्यास यावर 20,000 कंटेनर्स आहेत, म्हणजे 10 वर्षात या मालवाहू जहाजांची, दुप्पट माल वाहून नेण्याची क्षमता वाढवण्यात आली. तिसरा मुद्दा हा की, या जहाजाची लांबी 400 मीटर आहे. आता एवढे अजस्त्र जहाज सुएझ कालव्यातून सहजासहजी जाऊ शकेल का? या बद्दल सुदधा शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत.

सुएझ कालवा अनेक कारणासाठी महत्वाचा आहे. एकूण जागतिक व्यापारापैकी 12% व्यापार हा या जलवाहतुकीतून, कालव्यातून होतो. तसेच एकूण जलवाहतुकीच्या व्यापारापैकी 30% जलवाहतुक व्यापार हा या कालव्यातून होतो. हा कालवा इजिप्तच्या मालकीचा आहे. व्यापार ठप्प झाल्यामुळे ईजीप्त सरकारला 14 मिलियन डॉलर्स एवढं नुकसान दर दिवसाला होतं आहे. सुएझ कालवा हा एकूण 193 किलोमीटर एवढ्या लांबीचा आहे. सुरवातीला एकच लेन या कालव्यात होती. आशिया आणि युरोप खंडांना जोडणारा दुवा म्हणून या कालव्याचं महत्व आहे. याचबरोबर भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र या दोघांना हा सुएझ कालवा जोडण्याचं काम करतो. आशिया आणि आफ्रिका खंडाना वेगळं करण्याचं कामसुद्धा हा कालवा करतो. या कालव्याच्या उत्तरेला पोर्ट सैद बंदर आहे, तर दक्षिणेला पोर्ट तौफिक बंदर आहे. याचं विशेष म्हणजे दोन्ही बाजूंना पाण्याची पातळी ही समुद्राच्या पातळी एवढी ठेवण्यात आली आहे. या कालव्यामुळे इंधनाचा खर्च, आणि वेळेची बचत झाली आहे. सुएझ कालव्यावर नियंत्रण हे सुएझ कॅनल कंपनीकडे आहे. ही इजिप्त सरकारची कंपनी आहे. जहाजांच्या आकारमानांनुसार आणि प्रकारानुसार वेळोवेळी कालव्याची रुंदी आणि खोली वाढवण्यात आली आहे. पर्शियन आखाती देशातील खनिज तेल युरोपिय देशांकडे वाहून नेणार्‍या ऑइल टँकरची संख्या यात जास्त आहे. या कालव्यातून कोळसा, खनिज द्रव्ये, धातू, तेलबिया, सीमेंट, खते, तृणधान्ये आणि यंत्रसामग्री यांची जास्त वाहतूक असते. अंदाजे दिवसाला 50 मालवाहतुक जहाजं या कालव्यातून ये जा करतात.



इजिप्तचे सर्वेसर्वा गमाल अब्दुल नासर यांनी 1956 रोजी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केल्यानंतर इतिहासात प्रसिद्ध असा सुएझ क्रायसिस निर्माण झाला होता. या दरम्यान कालवा 8 वर्ष बंद करण्यात आला होता. 1975 ला परत हा कालवा सुरू करण्यात आला. यामुळे या कालव्याला सामरीक महत्व आहे. या कालव्यात अजून एक लेन तयार करण्यात आली जेणेकरून ट्रान्झिट टाईम वाढून यातून 100 जहाजं ये जा करू शकतील अशी योजना करण्यात आली. 1859 साली सुएझ कालवा तयार करण्याचे काम सुरू झाले. आणि 1869 ला काम पूर्ण झाले. हा मानवनिर्मित कालवा आहे.

परत मुद्दयाकडे यायचं म्हणजे, ‘एवर गिव्हन’ हे जहाजाच नाव आहे, हे जहाज ऑपरेट करणारी एव्हर ग्रीन मरीन ही तैवानची कंपनी आहे, तर जहाजाची मालकी, शोई किसेन या जपानी कंपनीची आहे. हे जहाज तैवानहून निघून नेदरलँडच्या रोटरडम या बंदराकडे निघालं  होतं. सुएझ कालव्यातून या जहाजाला जायचं असेल तर एकूण 18520 किलोमीटर एवढं अंतर कापत जावं लागेल आणि यासाठी 25 दिवसाचा कालावधी लागेल. तर याचा दुसरा पर्यायी मार्ग म्हणजे आफ्रिकेच्या दक्षिण दिशेला असणार्‍या ‘केप ऑफ गुड होप’ वरुन वळसा घालून मग अटलांटिक् समुद्रावरुन जाऊन रोटरडम बंदराला पोहोचता येईल, पण यासाठी 25000 किलोमीटर एवढं अंतर पार करावं लागेल आणि यासाठी 35 दिवस लागतील. एव्हर गिव्हन अडकल्यामुळे आता इतर अडकलेल्या आणि खोळंबून राहिलेल्या जहाजांसाठी दोनच पर्याय शिल्लक आहेत, ते असे की अजून एव्हर गिव्हन जहाज पूर्ण बाहेर निघून वाहतूक पूर्ववत होईपर्यंत तिथेच थांबायचं किंवा मग केप ऑफ गुड होप या पर्यायी मार्गाने आपाआपल्या ठरलेल्या स्थळी जायचं.

एकूणच काय तर एक मानवनिर्मित कालवा जागतिक व्यापार थांबवू शकतो आणि शेकडो कोटी डॉलर्सच नुकसान करू शकतो, इतका हा कालवा महत्वाचा आहे. ब्रिटनच्या एका कंपनीचं 1.7 मिलियन पौंडाचं फर्निचर या जहाजात अडकून पडलं आहे. तर महाराष्ट्रातून जागतिक बाजारपेठेत निर्यात होणारी द्राक्षसुद्धा यात अडकून पडली आहेत. या समस्येमुळे भारतीय शेअर बाजार काहीशे अंकांनी खाली गेला, तर भारतात इंधनाच्या किमती या 4 % इतक्या वाढल्या आहेत. आणि हे सगळं एक अजस्त्र जहाज अडकून पडल्यामुळे होत आहे. तज्ञांच्या नुसार प्लॅन बी म्हणजे जर सहजासहजी टग बोटींनी हे जहाज निघालं नाही तर मग मोठमोठ्या क्रेन्स आणून यावरचे कंटेनर्स काढावे लागतील. या जहाजावर 20000 कंटेनर्स आहेत. हा प्लॅन सोपा नाहीये. पण हाच एकमेव पर्याय आत्तातरी दिसतो आहे. काही आठवडे तरी जागतिक व्यापारावर याचा परिणाम होणार आहे. आणि हे कंटेनर्स जरी काढून जहाजाचं वजन कमी करायचे ठरवले तरीही त्यातसुद्धा काही आठवडे लागतील असं सगळं गणित आहे. येत्या काही दिवसात याबद्दल चित्र स्पष्ट होईल त्याची आपण वाट पाहुयात. 

-निखिल कासखेडीकर  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

हे आहे ज्ञात इतिहासातलं सगळ्यात कमी काळ चाललेलं युद्ध!

  युद्धाच्या कथा रम्य असतात असं आपण नेहमी म्हणतो आणि ऐकतो. प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि आधुनिक काळ असं आपण जर इतिहासाची काळानुसार विभागणी केली तर आपल्याला आढळेल की अगदी समस्त इतिहासात कुठली एक गोष्ट वारंवार घडत असेल तसंच कुठली एक गोष्ट शाश्वत असेल तर ती आहे युद्ध आणि युद्धच. यावर कोणाचही दुमत होणार नाही... मग तो इतिहास अगदी रोमन असो, ग्रीक असो, चीनचा असो ... थोडक्यात कुठलाही असो, पण याला अपवाद फक्त भारताचा आहे. भारताने स्वतःच्या साम्राज्यविस्तारासाठी कधीही कोणावरही युद्ध लादलं नाही, हे विशेष आहे. साम्राज्यवाढीसाठी, त्याच्या विस्तारासाठी, महत्वाकांक्षेसाठी, अजरामर होण्यासाठी इतिहासात युद्ध लढली गेली... यात एकाचा जय तर दुसऱ्याचा पराजय... अगदी आजच्या काळातलं उदाहरण घ्यायचं म्हणजे रशिया आणि युक्रेनमधलं युद्धं. पुतीन यांचा उद्देश हा साम्राज्यविस्ताराचा आहे, तर यूक्रेनला वाचवण्यासाठी पश्चिमी जग पुढे सरसावलं आहे. तर अशी ही आहे युद्ध लढण्यामागची प्रेरणा. बरं ही युद्ध दीर्घ काळासाठी लढली गेल्याचीही उदाहरण आहेत. आधुनिक जगातलं विसाव्या शतकातलं उदाहरण घ्यायचं झाल्यास पहिलं आणि दुसरं महायुद्ध...

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्...