मला आठवतं १० वर्षापूर्वी वर्तमान पत्रात
चंद्रावर मानवाच्या कॉलनीज स्थापायचा विचार आहे असे लेख यायचे. तेंव्हा वाटायचं की
असं जर खरच घडलं तर काय मजा येईल, म्हणजे चंद्रावर शेती केली, आणि तिथेच राहिलं तर
एकदमच थ्रील वाटेल. तेंव्हा वैज्ञानिकांच्या अभ्यासाच्या केंद्रस्थानी चंद्र होता,
आज त्याची जागा मंगळाने घेतली आहे एवढच...
माणसाकडे अफाट कल्पनाशक्तीची देणगी आहे. त्याच्या
कल्पनाशक्तीच्या जोरावर तो अवकाशात जाऊ पाहतो आहे. ही बाब चांगली आहे. रोज
तंत्रज्ञानात नवीन नवीन बदल होत आहेत...तसंच विश्वाकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून
पाहून, त्याला प्रयोगांची जोड देऊन मानव समस्यांची उकल करू पहात आहे. यात पूर्णपणे
अवकाशशास्त्राला वाहून घेतलेली संस्था म्हणजे नासा जगात अग्रस्थानी आहे.
पण काही काळापूर्वी ज्या कल्पनांच्या जोरावार
वैज्ञानिक आणि संपूर्ण कम्युनिटी नव्या नव्या कल्पना करण्यात व्यग्र होती
त्यांच्या समोर आज प्रश्न उभा आहे की अवकाश पर्यटन कितपत शक्य आहे?
नासाने आणि रशियन स्पेस एजेन्सी च्या संयुक्त
विद्यमाने सन २००० साली इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजेच आंतरराष्ट्रीय अवकाश
स्थानक उभारण्यात आले. त्यात अंतराळवीरांना नियमित म्हणजे ३ महिने किंवा ६
महिन्याच्या कालावधीसाठी त्या स्थानकावर पाठवण्यात येतं. अवकाश स्थानक हि जणू एक
प्रयोगशाळाच आहे. त्यात ज्यास्तीत ज्यास्त ६ अंतराळवीर एका वेळेस राहू शकतात. म्हणजे
अवकाशात जाण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे आपण अवकाश स्थानकावर जाणे असं म्हणू
शकतो.
मध्यंतरी वैज्ञानिकांनी इंटरप्लानेटरी स्पेस
टूर्स ही संकल्पना अस्तित्वात येऊ शकते असे विधान केले. (डिस्कव्हरी सायन्स या
चानेल वर तुम्ही याबद्दल विविध कार्यक्रम पाहू शकता). पण या संकल्पनेला तडा जाऊ
शकतो असं काहीसं घडलं आहे. अंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात स्कॉट केली या
अंतराळवीराने संपूर्ण एक वर्ष घालवले. या स्कॉट केलीला जुळा भाऊ आहे, त्याचं नाव
मार्क केली. नासाने या दोघांवर संशोधन करण्यासाठी ट्वीन रिसर्च एकस्पेरीमेंट केला.
म्हणजे एक भाऊ पृथ्वीवर त्याच नियमित आयुष्य जगत होता. तर तिकडे अवकाश स्थानकात
स्कॉट अवकाश स्थानकातलं आयुष्य व्यतीत करत होता. एक वर्षांनातर तो पृथ्वीवर परतला.
पण परत आल्यानंतर नासाच्या असं लक्षात आलं की, स्कॉट च्या शरीरातले ७% जीन्स परत
पुर्वस्वरुपात आले नाहीत. त्याला पृथ्वीवर आल्यानंतर चालतानासुद्धा त्रास होऊ
लागला. म्हणजे त्याला चालताच येत नव्हतं. त्याला त्याची मदतनीस व्यक्ती त्याला चालायला मदत करते आहे,
त्याला पुढे पाउल टाकायला शिकवत आहे असा व्हिडीओ मी पाहिला होता. मायक्रो
ग्रॅव्हीटीत एक वर्ष राहिल्यामुळे तो चालणच विसरला होता असं इथे आपण म्हणू शकतो. कारण
शून्य गुर्रुत्वाकर्षण असेल तर तुम्ही चालू शकत नाही, तर तुम्ही अवकाशात तरंगत
राहता. अवकाश स्थानकात तरंगावच लागतं, तिथे चालता येत नाही.
म्हणजे अवकाशात दीर्घ राहिल्यामुळे तुमच्या
शरीरावर नकारात्मक परिणाम होतात. ते परिणाम वेगवेगळे असू शकतात, पण ते काय असू
शकतात हे सांगणं जरा अवघड आहे. आणि जर शरीरावर नकारात्मक परिणाम होणार असतील तर मग
स्पेस टुर्स कश्या आयोजित केल्या जातील? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.
नासाने मंगळावर जाण्यासाठी मार्स मिशन आखले आहे.
त्यात ४ अंतराळवीरांची निवड त्याकरिता केली आहे. एलोन मस्क सुद्धा मानवाला २०२४
पर्यंत अंतराळात पाठवणार आहे अशी चर्चा आहे. नासाच्या मार्स मिशन बद्दल बोलायचं
झाल्यास, या अंतराळवीरांना मंगळावर जाण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी लागेल असे
नासाने सांगितले आहे. आणि परत मंगळावरून येण्यासाठी २ वर्ष लागतील. आणि तिथे काही
काळ अंतराळवीरांना घालवावा लागेल तो वेगळाच. असं जर असेल तर मग त्यांच्याही
शरीरावर या प्रवासाचा परिणाम होईल हे निश्चित. ही झाली एक बाब.
दुसरं म्हणजे स्पेस टुर्स वर येणारा खर्च अफाट
असेल. तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे, सामान्य व्यक्तीला अवकाशात जायचं असेल तर आधी
काही काळ ट्रेनिंग घ्यावं लागेल. हे वाटतं तितकं सोपं नाही. पण अशक्यही नाही.
उद्या कल्पना करा जर मानव जातीने पृथ्वी सोडून इतर ग्रहांवर वस्ती करण्याचे ठरवले
तर काय? अंतराळवीर होण्यासाठी विशिष्ट ट्रेनिंग घ्यावे लागते. अमेरिकी अवकाश
संस्था नासा, समुद्रात आणि पाण्याखाली भविष्यात अंतराळवीर होऊ पाहणार्यांना ट्रेनिंग
देते. पाण्यात अश्यासाठी की पाण्यात आपल्याला शून्य गुरुत्वाकर्षणाचा अनुभव येतो. पाण्यात
आपण तंरंगतो. म्हणून शेकडो तास पाण्याखाली ट्रेनिंग घेऊन झाल्यानंतर त्या व्यक्तींचे
शरीर हे शून्य गुरुत्वाकर्षणामध्ये राहण्यासाठी तयार होते असे म्हणता येईल. चौथी
गोष्ट म्हणजे माझ्या माहितीनुसार हवाई दलातील व्यक्तीच अंतराळवीर म्हणून निवडली
जाऊ शकते. कारण त्या व्यक्तीला आकाशात विमान चालवण्याचा अनुभव असतो. म्हणजे ती
पायलट असते.
अश्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन झाल्यानंतर
आपल्याला लक्षात येईल की, स्पेस टूरीजम ही प्रत्यक्षात आणायला किती अवघड संकल्पना
आहे ते. सुरवातीला इंटर प्लानेटरी स्पेस टुर्स ही कल्पना मजेदार आणि मानवाच्या
आवाक्यातली वाटली होती. पण नुकत्याच दिल्या गेलेल्या बातमीनुसार अंतराळवीर स्कॉट
केली च्या शरीरावर नकारात्मक परिणाम झाला ही बातमी आली आणि स्पेस टूरीजम अवघड आहे
असे वाटू लागले.
इंटर प्लानेटरी स्पेस टुर्स ही संकल्पना तर
भन्नाटच होती. त्यामध्ये ज्या प्रमाणे आपण वेगवेगळ्या स्थळांना भेटी देतो किंवा
शहरांना भेटी देतो, त्या प्रमाणे आपण एकाच प्रवासात वेगवेगळ्या ग्रहांना भेटी
द्यायचे अभिप्रेत होते. यासाठी खूप अद्ययावत तंत्रज्ञान लागेल ते मानवाकडे नाहीये
अजून. प्रत्येक व्यक्तीला हा प्रवास झेपेल असेही सांगता येत नाही. त्यामुळे पूर्वी
शक्य वाटणारी कल्पना आता फक्त एक वैज्ञानिक संकल्पना म्हणूनच उरली आहे.
पण मानव हार मानणार्यातला नाही, तो यांवर पण
संशोधन करून विज्ञानाचा आधार घेऊन मार्ग काढेल, पण तूर्तास स्पेस टुर्स ही
संकल्पना कागदावरच राहील हे खेदाने म्हणावे लागत आहे.
भविष्यात मात्र संशोधन होऊन यांवर मार्ग काढता
येईल. त्यामुळे विश्वप्रवासाची तयारीच काय आपण ती करू शकतो.
निखिल कासखेडीकर
(फोटो गुगल वरून साभार)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा