मुख्य सामग्रीवर वगळा

अमेरिकेला धडा शिकवण्याचा उद्योग


अशात लॅटिन (दक्षिण) अमेरिकेत ब-याच घडामोडी घडत आहेत. त्याचा परिणाम हा अमेरिकेवर होतोच. काही वेळा अमेरिकेचे परराष्ट्र धोरण मुख्यत: लॅटिन अमेरिकन देशांच्या विरुद्ध असते. कारण तसं सरळ आहे. बरेचसे लॅटिन अमेरिकन देशांमध्ये डावी किंवा समाजवादी विचारांची सरकारे आहेत. अमेरिका म्हटलं कि आपल्याला फक्त उत्तर अमेरिका आणि लॅटिन अमेरिका इतकाच भूगोल आठवतो. पण मध्य अमेरिका नावाचा भूभाग अस्तित्वात आहे हे आपण विसरतोच. साधारण मेक्सिकोच्या दक्षिणेकडे मध्य अमेरिकेचा भूभाग चालू होतो आणि मध्य अमेरिकेच्या दक्षिणेकडे अर्थात लॅटिन अमेरिका सुरु होते. म्हणजे उत्तर अमेरिका आणि लॅटिन अमेरिका यांना जोडणारा प्रदेश हा मध्य अमेरिका नावाने ओळखला जातो. या मध्य अमेरिकेत एकूण सात देश आहेत. त्यातला एक देश म्हणजे निकाराग्वा!

निकाराग्वाचा उल्लेख आता करण्याचे कारण पण तसेच आहे. वर म्हटल्या प्रमाणे लॅटिन अमेरिकन देशांमध्ये घडणाऱ्या घडामोडींचा परिणाम अमेरिकेवर तसेच जगभर होत असतो, तसाच परिणाम हा मध्य अमेरिकेतल्या देशांचा अमेरिकेच्या राजकारणावर होत असतो. नुकतीच एक ताजी घटना घडली. काही दिवसांपूर्वी निकाराग्वा सरकारने अमेरिकेच्या तीन मुत्सद्द्यांना अमेरिकेत परत पाठवले. याचे अगदीच बालिश कारण देण्यात आले. काय तर म्हणे हे अमेरिकेचे राजनैतिक अधिकारी कस्टम्सच्या भागात दहशतवाद आणि ड्रग्स विरोधी कारवाई करत होते, ते पण निकॅराग्वान सरकारच्या सम्मतीविनाच! आपण वर वर पाहिल तर प्रसंग फार छोटा आहे. आंतरराष्ट्रीय राजनैतिक वर्तुळात अश्या घटना घडत असतात. कधी कधी मुत्सद्द्यांना त्यांच्या देशात परत पाठवले जाते किंवा मग राजदूताला किंवा हायकमिशनरला समज दिली जाते. आपल्याला वाटेल कि यात नवीन काय. पण इथे याचा वेगळा संदर्भ आहे.

निकाराग्वाचे सद्य सरकार हे लोकशाहीवादी असले तरी डाव्या, समाजवादी विचारसरणीने प्रेरित झाले आहे. निकाराग्वामध्ये राष्ट्रपतीच देशाचा आणि त्या अनुषंगाने सरकारचा खरा राज्य प्रमुख असतो. आताच्या घडीला ‘होसे डॅनियल ओर्टेगा सावेद्रा’ हे राष्ट्रपती पदावर विराजमान आहेत. ह्या माणसाचा आणि अमेरीकेचा पूर्वीपासूनच छत्तीसचा आकडा. अमेरिकेने ह्याच्या विरोधी पक्षाच्या आणि चळवळीच्या राजकारण्यांना सढळ हाताने नेहमीच मदत केली. डॅनियल ओर्टेगांना सत्तेत येण्यापासून रोखण्यामध्ये अमेरिकेने बरीच कारस्थाने केली. पण कसाबसा हा माणूस २००७ ला परत सत्तेत आला. म्हणून याचा अमेरिकेवर विशेष राग!

बरं हा पण काही साधासुधा नाही. हे तसे उद्योगशील व्यक्तिमत्व. महाशयांनी क्युबा मध्ये जाऊन तिथल्या मार्क्सिस्ट – लेनिनीस्ट सरकारकडे जाऊन गोरील्ला युद्धाचे रीतसर प्रशिक्षण घेतले. निकाराग्वातल्या राज्यक्रांतीनंतर मग डॅनियल ओर्टेगा राजकारणात अधिक सक्रीय झाले आणि बहुपक्षीय सरकारचे अध्यक्ष बनले. त्यांनी सुरवातीला राष्ट्रीयीकरण, जमीन सुधारणा, तसेच शैक्षणिक उपक्रम असे विविध उद्योग केले. डॅनियल ओर्टेगा आणि व्हेनेझुएलाचा हुगो चावेझ म्हणजे तर घनिष्ट मित्रच.

२००७ साली निवडून आल्यानंतर मात्र त्यांनी निकाराग्वाच्या राजकारणावर पकड मिळवली आणि ती आजतगायत कायम आहे. मिळेल त्या प्रसंगी अमेरिकेला धडा शिकवण्याचा नवीन उपक्रम यांनी सध्या हाती घेतला आहे असे दिसते आहे. त्याचीच परिणीती म्हणजे क्षुल्लक कारणांवरून अमेरिकी मुत्सद्द्यांना घरी धाडण्याचे परमकर्तव्य त्यांनी केले आहे. अर्थात अमेरिकेने निकाराग्वा सरकारला इशारा दिला आहे, कि या प्रकरणाचे अमेरिका आणि निकाराग्वा यांच्या व्यापारी संबंधांवर प्रतिकूल परिणाम होतील. निकाराग्वा सरकारने मुत्सद्द्यांना त्यांच्या त्यांच्या घरी पाठवल्यानंतर, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातील   अधिका-यांनी पत्रकार परिषद घेऊन हा धमकी वजा इशारा देऊ केला आहे. याचा निकाराग्वाच्या तारणहारावर आणि त्यांच्या सरकारवर काही परिणाम होतो का हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

- निखील कासखेडीकर   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

हे आहे ज्ञात इतिहासातलं सगळ्यात कमी काळ चाललेलं युद्ध!

  युद्धाच्या कथा रम्य असतात असं आपण नेहमी म्हणतो आणि ऐकतो. प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि आधुनिक काळ असं आपण जर इतिहासाची काळानुसार विभागणी केली तर आपल्याला आढळेल की अगदी समस्त इतिहासात कुठली एक गोष्ट वारंवार घडत असेल तसंच कुठली एक गोष्ट शाश्वत असेल तर ती आहे युद्ध आणि युद्धच. यावर कोणाचही दुमत होणार नाही... मग तो इतिहास अगदी रोमन असो, ग्रीक असो, चीनचा असो ... थोडक्यात कुठलाही असो, पण याला अपवाद फक्त भारताचा आहे. भारताने स्वतःच्या साम्राज्यविस्तारासाठी कधीही कोणावरही युद्ध लादलं नाही, हे विशेष आहे. साम्राज्यवाढीसाठी, त्याच्या विस्तारासाठी, महत्वाकांक्षेसाठी, अजरामर होण्यासाठी इतिहासात युद्ध लढली गेली... यात एकाचा जय तर दुसऱ्याचा पराजय... अगदी आजच्या काळातलं उदाहरण घ्यायचं म्हणजे रशिया आणि युक्रेनमधलं युद्धं. पुतीन यांचा उद्देश हा साम्राज्यविस्ताराचा आहे, तर यूक्रेनला वाचवण्यासाठी पश्चिमी जग पुढे सरसावलं आहे. तर अशी ही आहे युद्ध लढण्यामागची प्रेरणा. बरं ही युद्ध दीर्घ काळासाठी लढली गेल्याचीही उदाहरण आहेत. आधुनिक जगातलं विसाव्या शतकातलं उदाहरण घ्यायचं झाल्यास पहिलं आणि दुसरं महायुद्ध...

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्...