मुख्य सामग्रीवर वगळा

रशियन हेरखात्याचे पुनरुत्थान!

हेरांबद्दल आणि हेरकथांबद्दल सामान्य व्यक्तीला सतत आकर्षण वाटत आल आहे. आपल्याला सर्वाना परिचित अश्या इयान फ्लेमिंगच्या “जेम्स बॉंड” या पात्राबद्दल, एकंदरीतच जनमानसात खूपच कुतूहल आहे. अश्या हेरगिरीच्या घटना प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा घडत असतात. फक्त त्या अगदी बॉंडपटातल्या सारख्याच घडतील असं नाही. हेर विश्वातली अशीच एक महत्वाची घटना घडली थेट अमेरिकेत, आणि ती पण रशियन हेरांकडून. यांवर अमेरिकेच्या सी आय ए ने, एक मोठा अहवालच बनवला आणि अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत थेट हस्तक्षेप करून राष्ट्रपती होऊ घातलेले डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी केले असा आरोप निश्चित करून, ३५ रशियन मुत्सद्द्यांना त्यांच्या कुटुंबासकट परत रशियात धाडले.



अमेरिकेतल्या  राष्ट्रपती पदासाठी होणाऱ्या निवडणूकीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले होते. त्यात राष्ट्रपतीपदासाठी दोन प्रमुख उमेदवार होते, डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाकडून  तर हिलरी क्लिंटन डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणुकीत उभे होते. अमेरिकी प्रसार माध्यमांनी हिलरी क्लिंटन निवडून येणार असे जोरकसपणे सांगितले. थोडक्यात निवडणुकीत हिलरींची हवा होती, पण झाले उलटेच! निकाल हाती लागताच डोनाल्ड ट्रम्प विजयी घोषित झाले. हा निकाल पचवणे अमेरिकी जनतेला तसेच प्रसार माध्यमांना अवघड गेले. आणि साऱ्या जगाला या निकालाबद्दल आश्चर्य वाटले. हा निकाल अनाकलनीय वाटल्याने ओबामा प्रशासनाने लगेच त्यावर सी आय ए ला आणि एफ बी आय ला आदेश देऊन एक अहवाल द्यायला सांगितला. हा रीतसर अहवाल देताना सी आय ए ने सांगितले की निवडणुकीत फार मोठा हस्तक्षेप करून, रशियाने डोनाल्ड ट्रम्प यांना निवडून येण्यासाठी मदत केली. त्यासाठी रशियाने आपल्या हेरखात्यांचा आणि हेरांचा पुरेपूर वापर करून घेतला. यासाठी थेट अमेरिकेत राहून छुप्या कारवाया केल्या.

इथे महत्वाचा मुद्दा असा की रशियन हेरखाती पुन्हा मोठ्या प्रमाणावर सक्रीय झाली आहेत. खरच रशियाने डोनाल्ड ट्रम्प यांना निवडून येण्यास मदत केली का? त्यासाठी हेर खात्यांचा उपयोग केला का? अमेरिकेच्या सी आय ए ला हे सगळे माहितीच नव्हते का? एफ बी आय ला सुद्धा याचा अंदाज नव्हता का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणे आतातरी थोडे कठीण आहे. मात्र एक अधोरेखित करण्याची बाब म्हणजे रशियाचे पुतीन यांची रशियावर मजबूत असलेली पकड! पुतीन हा माणूस एकेकाळी सैन्यदलात कर्नल या पदावर होता, त्यानंतर त्यांचा प्रभाव वाढल्यानंतर त्यांची थेट के जी बी या रशियाच्या हेरखात्याच्या प्रमुख पदी वर्णी लागली. या काळात शीतयुद्धात अमेरिकेच्या सी आय ए आणि रशियाच्या के जी बीत एक प्रकारचे छुपे युध्द चालू होते. दोनीही बाजू वरचढ होऊ पाहत होत्या. पण आता शीतयुद्ध संपल्यात जमा आहे असे म्हणणे योग्य ठरेल कारण रशियाला अमेरिकेबरोबर आघाडी उघडायची आहे.

सद्य काळात रशियाची एकूण चार हेर खाती सक्रीय आहेत. आपल्या सर्वाना शीत युद्धातली फक्त के जी बी परिचित आहे. पण ती जागा आता एफ एस बी ने घेतली आहे. एफ एस बी म्हणजे Federal Security Service of the Russian Federation (FSB), तसेच Federal Protective Service of Russia (FSO), Main Intelligence Directorate of the General Staff (GRU), आणि Foreign Intelligence Service (SVR).



हे जे रशियाचे जी आर यु हेरखाते आहे त्यावर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. त्यांच्यावर सायबर ऑपरेशन्स आणि हॅकिंग करण्यासाठी साहित्य पुरवल्याचा आरोप आहे. बर त्यात हे जे जी आर यु हेरखाते आहे हे मिलिटरी इंटेलीजेंसशी संबंधित आहे आणि ज्या ३५ जणांना ओबामा प्रशासनाने घरचा रस्ता दाखवला आहे हे सगळे जी आर यु चे मोठ्या पदावरचे एकनिष्ठ अधिकारी आहेत.
जी आर यु १९९० मध्ये बरखास्त करण्याचे ठरले होते आणि हे हेरखाते काही काळ बंद झाले होते. पण २००६ ला जी आर यु ला नवीन हेडक्वार्टर मिळाले आणि ते परत सक्रीय झाले. २०१४ ला क्रायमिया वर कारवाई करण्यात जी आर यु अग्रेसर होते. तसेच पूर्व युक्रेन मध्ये त्यांनी हस्तक्षेप केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला.

हे सगळं झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या मताला महत्व आहे. त्यांनी रशियन हेरखात्याने अमेरिकी निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केल्याचा इन्कार केला आहे. ट्रम्प यांच्या प्रवक्त्या केली अॅन कॉनवे यांनी जी आर यु इथे अमेरिकेत सक्रीय नाही, त्यांची इथे कुठलीही मालमत्ता नाही असे सांगून या वृत्ताचे खंडन केले आहे.


मुळात रशियाला डोनाल्ड ट्रम्प यांना निवडून देण्यात का रस आहे किंवा रशियाला डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्रपती पदावर का विराजमान व्हावयाचे आहे हा औत्सुक्याचा मुद्दा आहे. यात एक विश्लेषण म्हणजे ज्या रिपब्लिकन पक्षाचे ट्रम्प प्रतिनिधी आहेत त्या पक्षाचा अमेरिकेच्या गोऱ्या मतदारांवर प्रभाव आहे. सध्या आयसीस या दहशतवादी संघटनेने थैमान घातले आहे आणि याला कितीही नाही म्हटला तरीही धर्माचा कोन आहे. इस्लामी दहशतवादी विरुद्ध अमेरिका, रशिया आणि युरोपमधल्या देशांची आघाडी असे नवे समीकरण आधीपासूनच तयार झाले आहे. आता त्यात काही आखाती देशसुद्धा सामील होतील आणि इस्राईल त्यांना येवून मिळेल. त्या बरोबरच भारताची भूमिका पण आशिया खंडात महत्वाची असेल. महाकाय चीनचे धोरण जाणून घेणे सुद्धा औत्सुक्याचे ठरेल कारण चीन उइघुर बंडखोरांच्या विरुद्ध आहे. आणि जिंग जिआंग प्रांतात त्यांच्या वर आतापर्यंत कारवाई करत आला आहे. याचा करता करविता रशिया आहे आणि तो अमेरिकेला बरोबर घेऊन अनेक देशांच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव टाकू पाहतो आहे. पूर्वीचे शीत युद्धाचे दिवस आता संपले आहेत, आता नवीन आघाड्या उघडून अमेरिका आणि रशिया जगाचे नेतृत्व करण्यास सिद्ध झाले आहेत, असे चित्र उभे राहते आहे. या चित्रात अजून कोणते देश रंग भरतील हे बघावे लागेल. पण एक मात्र नक्की, या सगळ्यात रशियन हेरखात्याचे पुनरुत्थान झाले आहे असे म्हणावयास जागा आहे.

-निखील कासखेडीकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

  ‘ टोंगा ’ हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया , मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. या राज्यावर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती , १९७० पर्यन्त... त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला ... हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण विशेष असं सांगण्यासारखं १५ जानेवारी २०२२ पर्यन्त असं काही नव्हतं. पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या ‘ हुंगा टोंगा हुंगा हापाई ’ या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला टोंगा हे नाव माहीत झालं. या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं , असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली... पाण्याने प्रदेश व्य...

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्...