मुख्य सामग्रीवर वगळा

सुसाट ड्रॅगन सुस्तावणार!


महाकाय चीनी अर्थव्यवस्थेमध्ये सध्या उलटे वारे वाहू लागले आहेत. या वर्षी चीनचा आर्थिक विकासदर अपेक्षेपेक्षा खूपच मंदावलेला असणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेच्या अहवालानुसार चीनी अर्थव्यवस्थेचा विकासदर चालू आर्थिक वर्षात ६.३ % इतका असणार आहे. ६% विकासदर आकडा तसा वाईट नाही, पण मागच्या २५ वर्षातील विकासदरांपेक्षा चालू विकासदर सगळ्यात कमी आहे, ही नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. आतापर्यंत जगात चीनी विकासदराला, जागतिक अर्थव्यवस्थेचे इंजिन मानले जायचे. पण चीनी इंजिन बंद पडून त्याचा डबा झाला आहे. याचा अर्थ आता कुठल्यातरी दुसर्या इंजिनाने (दुसर्या देशाने) चीनी (अर्थव्यवस्थेच्या) डब्याला ओढण्याची गरज निर्माण झाली आहे.



आंतरराष्ट्रीय तज्ञानुसार चीनी सरकार जे आकडे प्रसिद्ध करते, ते सहसा विश्वासार्ह नसतात. विकास दराचेच उदाहरण द्यायचे झाल्यास तज्ञांच्या मते चीनी सरकार विकासदराची जी आकडेवारी प्रसिद्ध करते त्यापेक्षा प्रत्यक्षात विकास दर कमीच असतो. याचे अजून एक कारण सांगता येईल, ते म्हणजे चीनमध्ये सत्तेत असलेले कम्युनिस्ट पक्षाचे सरकार. हे सरकार जनतेसमोर आणि आंतरराष्ट्रीय समुदायासमोर स्वतःची चांगली प्रतिमा तयार करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असते.
या अर्थव्यवस्थेच्या चढ उतरामागे आणि कमी विकासदराच्या मागे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे चीनी सरकारला आता, स्वतःची ‘निर्यातदार देश’ हि संकल्पना पुसून टाकायची आहे. आतापर्यंत महाकाय चीन ची ओळख म्हणजे सर्व जगाला ‘हरतऱ्हेच्या वस्तू निर्यात करणारा देश’ अशी होती. चीनी सरकारला आता असं जाणवू लागलं आहे कि, नुसता निर्यातदार देश म्हणून ओळख, ही काही फार काळ टिकणारी नाही आणि एखाद्या देशासाठी निर्यातीबरोबर आयातसुद्धा खूप महत्वाची असते. तर देशाचा अर्थव्यवस्थारूपी गाडा नीट चालतो. हेच एका सक्षम आणि सुदृढ अर्थव्यवस्थेचे लक्षण म्हणायला हरकत नाही. चीनला निर्यात आणि गुंतवणुकीच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या अर्थव्यवस्थेला उपभोगीय आणि सेवा क्षेत्रात अग्रेसर बनवायचे आहे.
अर्थशास्त्रात Dumping ही संकल्पना अस्तिवात आहे. याचा अर्थ आपल्या देशांतील माल दुसऱ्या देशात जाऊन आपल्या देशात असलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीला विकणे. असे अनेक उद्योग चीन आज पर्यंत करत आला आहे. खुद्द भारताचेच पहा ना आपल्याकडील बाजारात चीनने गणपतींच्या मुर्त्यांपासून ते टिकल्यां पर्यंत(स्वतःच्या देशांत टिकली/कुंकू लावण्याची प्रथा नसतानाही) सर्व काही अत्यंत कमी किमतीत विकले आहे. आपल्या इकडील इलेक्ट्रॉनिक मार्केट चीनने जणू काबीज केले आहे. वेगवेगळ्या चीनी वस्तूंचा सुळसुळाट झाला आहे. चीनने नेहमीच क्वालिटी पेक्षा क्वांटीटी ला महत्व दिले आहे. पण याचा परिणाम असा झाला कि चीनने आपल्या वस्तूंसंबंधीची विश्वासार्हता गमावली आहे. 




चीनने आतापर्यंत आम्ही वस्तू उत्पादनात giant आहोत असे दाखवले, जिथे अमेरिका पोहोचली नाही अश्या प्रदेशात जाऊन आपला माल विकला. विशेषकरून आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका खंडावर लक्ष केंद्रित करून त्याप्रमाणे स्वतःची निर्यात वाढवली. चीनने आफ्रिका खंडातील देशांबरोबर त्यांचे संबंध खूप सुधरवले आहेत. किती? याचे उदाहरण द्यायचे झाल्यास मध्यंतरी झिम्बाब्वे हा देश अत्यंत बिकट आर्थिक संक्रमणातून जात होता, त्या देशात चलनवाढीने परिसीमा गाठली होती. सामान्यांना जिणे जर्जर झाले होते. मग अश्या परिस्थितीत चीनाने संधी ओळखून मदतीचा हात (?) पुढे केला, आणि आता परिस्थिती अशी आहे कि झिम्बाब्वे ने चीनच्या युआन चलनाला स्वताच्या देशाचे चलन म्हणून घोषित केले आहे. अशी चीनची ख्याती अपारच आहे. 




नुकतंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मध्ये प्रमुख चलनानबरोबर आता चीनच्या युआन चलनाचा सुद्धा समावेश झाला आहे. त्यामुळे चीनचे जगात प्रस्थ वाढले आहे. अमेरिकेला शह देणाऱ्या चीनने आता सेवा क्षेत्र आणि उपभोक्त्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला आहे. या सगळ्या गोष्टी ठीक असल्या तरी आता चीनी अर्थव्यवस्थेमध्ये मुलभूत बदल होणार काय हे बघावे लागेल, निर्यातीवर परिणाम झाला तर आयात वाढून देशाच्या जमा खर्चाच्या ताळेबंदावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. परिणामी जो चीन निर्यात वाढवून इतर देशांना आपल्या कब्जात घेत होता तो चीन आता तेवढासा परिणाम साधू शकणार नाही असे दिसते. याचा सगळ्यात मोठा परिणाम हा चीनच्या परराष्ट्र धोरणावर होईल यात शंका नाही. म्हणून येत्या काळात “महाकाय ड्रॅगन” हे बिरूद चीन लावू शकेल का हे पाहणे अभ्यासाचे ठरेल.


-निखील कासखेडीकर

टिप्पण्या

  1. खूप छान निखिल ! भाषा खूपच सोपी आणि सहज असल्याने मला (की जीला अर्थशास्त्रात काडीचाही रस नाही) वाचावेसे आणि समजुन घ्यावेसे वाटले. असाच लिहीत रहा आणि आम्हाला शिक्षित कर .

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद स्नेहल! तुमच्या शुभेच्छा माझ्या मागे आहेतच, त्यामुळे मी नवीन नवीन विषय तुम्हा सगळ्यांसमोर मांडेल, तुम्हाला ते समजतील आणि आवडतीलही.

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

हे आहे ज्ञात इतिहासातलं सगळ्यात कमी काळ चाललेलं युद्ध!

  युद्धाच्या कथा रम्य असतात असं आपण नेहमी म्हणतो आणि ऐकतो. प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि आधुनिक काळ असं आपण जर इतिहासाची काळानुसार विभागणी केली तर आपल्याला आढळेल की अगदी समस्त इतिहासात कुठली एक गोष्ट वारंवार घडत असेल तसंच कुठली एक गोष्ट शाश्वत असेल तर ती आहे युद्ध आणि युद्धच. यावर कोणाचही दुमत होणार नाही... मग तो इतिहास अगदी रोमन असो, ग्रीक असो, चीनचा असो ... थोडक्यात कुठलाही असो, पण याला अपवाद फक्त भारताचा आहे. भारताने स्वतःच्या साम्राज्यविस्तारासाठी कधीही कोणावरही युद्ध लादलं नाही, हे विशेष आहे. साम्राज्यवाढीसाठी, त्याच्या विस्तारासाठी, महत्वाकांक्षेसाठी, अजरामर होण्यासाठी इतिहासात युद्ध लढली गेली... यात एकाचा जय तर दुसऱ्याचा पराजय... अगदी आजच्या काळातलं उदाहरण घ्यायचं म्हणजे रशिया आणि युक्रेनमधलं युद्धं. पुतीन यांचा उद्देश हा साम्राज्यविस्ताराचा आहे, तर यूक्रेनला वाचवण्यासाठी पश्चिमी जग पुढे सरसावलं आहे. तर अशी ही आहे युद्ध लढण्यामागची प्रेरणा. बरं ही युद्ध दीर्घ काळासाठी लढली गेल्याचीही उदाहरण आहेत. आधुनिक जगातलं विसाव्या शतकातलं उदाहरण घ्यायचं झाल्यास पहिलं आणि दुसरं महायुद्ध...

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्...