मुख्य सामग्रीवर वगळा

वर्तमान जागतिक घडामोडी आणि स्थलांतर



      आज जग एका नव्या वळणावर येऊन पोहोचले आहे. जगात अनेक ठिकाणी यादवी सुरु आहे नाहीतर युद्धसदृश परिस्थिती आहे, म्हणजे अंतर्गत कलह आलेच. www.ourworldindata.org  या वेबसाईट नुसार, शीतयुद्ध संपेपर्यंत अनेक संघर्षांचे (इथे सैनिकी युद्ध) प्रमाण जगात वाढले होते. www.foreignpolicy.com या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या विषयावर महत्वाचे भाष्य करणाऱ्या वेबसाईटने,(मासिकाने) ‘२०१७ या विद्यमान वर्षात होऊ शकणारे १० महत्वाचे संघर्ष’ यावर टिप्पणी केली आहे. त्यानुसार, सिरीया आणि इराक, तुर्कस्तान, येमेन, ग्रेटर साहेल आणि लेक चाड बेसिनचा संघर्ष, डेमोक्रॅटीक रिपब्लिक ऑफ कोंगो, दक्षिण सुदान, अफगाणिस्तान, म्यानमार, युक्रेन आणि मेक्सिको इथल्या संघर्षात वाढ होईल असे नमूद करण्यात आले आहे. हा झाला संघर्षाचा आणि युद्धाचा भाग. पण या आणि अश्या अनेक संघर्षांमुळे एक प्रश्न ऐरणीवर आला आहे, तो म्हणजे निर्वासितांचा. या निर्वासितांमध्ये स्थलांतर करण्याचे प्रमाण अधिक आहे. एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिकानुसार आतापर्यंत जगाच्या अनेक भागात, इतिहासात, अशी स्थलांतरे ज्याला ‘मास मायग्रेशन’ म्हणता येईल, अशी झाली आहेत पण त्यातही २० व्या शतकात झालेल्या भारताच्या फाळणीच्या वेळी (ऑगस्ट, १९४७) झालेले स्थलांतर सगळ्यात मोठे स्थलांतर होते. युनायटेड नेशन्स हायकमिशनर फॉर रेफ्युजीज या एजन्सीने म्हणजेच UNHCR ने पण याला दुजोरा दिला आहे. या भारताच्या फाळणीत जवळपास १,४०,००,००० लोकांनी स्थलांतर केले. धार्मिक आधारावर झालेल्या या फाळणीत मुस्लीम धर्मीय अनेक लोक भारतातून पाकिस्तानात गेले आणि हिंदू धर्मीय, शीख पंथातले लोक पाकिस्तानातून भारतात आले.
   




*स्थलांतर म्हणजे...
     
     संयुक्त राष्ट्र संघटनेची एक एजन्सीच स्थलांतरितांसाठी वाहिलेली आहे. तिचे नाव आहे, ‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन’. या संस्थेनुसार स्थलांतर म्हणजे एखाद्या व्यक्तीने अथवा एखाद्या व्यक्तींच्या समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी केलेले स्थानांतर! मग ते देशांतर्गत असेल किंवा देशाबाहेरील असेल. या व्याखेत निर्वासित पण येतात ज्यांना आपण रेफ्युजीज असं म्हणतो. पण असं जरी असलं तरी न्यूयॉर्क टाइम्सच्या एका महत्वाच्या लेखानुसार स्थलांतरितांमध्ये आणि निर्वासितांमध्ये फरक आहे. स्थलांतरित लोक हे वेगवेगळ्या कारणांसाठी स्थलांतर करतात, उदाहरणार्थ चांगल्या नोकरीच्या शोधात किंवा चांगल्या जीवनमानाच्या शोधात अनेक लोक विकसनशील देशातून विकसित देशांत स्थलांतर करतात आणि हे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होत आहे. आजही भारतासारख्या देशातून अमेरिकेत आणि युरोपमध्ये जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. इंग्रजीत ज्याला आपण ‘इंडियन डायास्पोरा’ म्हणतो. म्हणजे स्थलांतरित भारतीयांची संख्या युनायटेड नेशन्सच्या इंटरनॅशनल मायग्रेशन रिपोर्ट २०१५ नुसार जगांत सगळ्यात ज्यास्त म्हणजे १,६०,००,००० इतकी आहे. त्या खालोखाल मेक्सिकोचा क्रमांक लागतो, आणि नंतर रशियन फेडरेशनचा. हे झाले स्थलांतराचे.
     



निर्वासितांचा विचार करायचा झाल्यास निर्वासित या शब्दातच मुळात या संकल्पनेचा अर्थ सामावलेला आहे. आसरा घ्यायला किंवा आश्रय घायला जागा नाही म्हणून स्थानांतर करणारे लोक म्हणजे निर्वासित. इथे प्रमुख लक्षात घेण्यासारखा भाग म्हणजे निर्वासित हे केवळ युद्धजन्य परिस्थती किंवा प्रत्यक्ष युद्धामुळेच निर्वासित होतात. स्थलान्तरीतांना काही कारणास्तव त्यांच्या देशात परत पाठवले जाऊ शकते, पण निर्वासित लोकांवर असे बंधन घालता येत नाही. युनायटेड नेशन्सच्या १९५१ च्या रेफ्युजी कन्व्हेन्शन नुसार जर एखाद्या देशात निर्वासित आले तर कायदेशीरदृष्ट्या त्यांना परत पाठवता येत नाही. स्थलांतर करणाऱ्या व्यक्तींकडे अधिकृत कागदपत्रे असली तरीही त्यांना एखाद्या देशातून परत पाठवले जाऊ शकते, याउलट निर्वासितांकडे जरी अधिकृत कागदपत्रे नसली तरी त्यांना कुठल्याही देशात वास्तव्य करता येऊ शकते.

*युरोपियन मायग्रंट क्रायसिस...
      
      सध्याच्या काळात जर कुठल मोठं संकट जगावर आलं असेल तर ते युरोपियन स्थलांतरितांचं संकट आहे. भूमध्य समुद्र पार करून, किंवा दक्षिण पूर्व युरोपमधून अनेक लोक युरोपियन युनिअन मध्ये येत आहेत. असं म्हटलं जातंय की, यातले काही लोक, आर्थिक सुरक्षेसाठी, तसेच चांगल्या संधीच्या शोधात युरोपकडे येत आहेत. त्याचप्रमाणे आयसीसला कंटाळून सुद्धा लोक स्थलांतर करत आहेत. प्रामुख्याने मुस्लीमबहुल देशातले लोक युरोपमध्ये येत आहेत. यात दक्षिण आणि पूर्व युरोप, पश्चिम आशिया, दक्षिण आशिया, आफ्रिकेतून आलेले लोक सगळ्यात ज्यास्त आहेत. UNHCR नुसार युरोपमध्ये प्रवेश करणाऱ्या लोकांमध्ये त्यातही सिरीया, अफगाणिस्तान आणि इराक या तीन देशांमधून आलेल्या लोकांची संख्या ज्यास्त आहे. त्यामुळे हे तीन देश शीर्षस्थानी आहेत. ऑस्ट्रिया, क्रोएशीया, डेन्मार्क, फ्रांस, फिनलंड, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, इटली, माल्टा, स्पेन, नॉर्वे, स्लोव्हेनिया, स्वीडन, स्वित्झर्लंड, आणि तुर्कस्तानमध्ये सगळ्यात ज्यास्त स्थलांतरित लोक आले आहेत.



*स्थलांतराची जागतिक आकडेवारी...
     
      ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या २०१६ च्या अहवालानुसार जगात सुमारे २४,४०,००,००० लोक हे स्थलांतरित आहेत. जगाच्या लोकसंखेच्या परिप्रेक्षात विचार केल्यास ही आकडेवारी ३.३% इतकी आहे. जणू सगळ्या स्थलान्तरीताना एकत्र केले तर त्यांचा एक वेगळा देशच तयार होईल. १९६० नन्तर या वाढीचा दर पाहिला तर तो जवळ जवळ २००% इतका आहे. जरी जागतिक स्थलान्तर वाढत असले तरीही ते जगाच्या लोकसंख्या वाढीच्या प्रमाणाएवढे वाढले नाही असं सुद्धा हा अहवाल सांगतो. एकट्या अमेरिकेत, ज्यांचा जन्म अमेरिकेत झाला नाही पण जे सद्य स्थितीत अमेरिकेत वास्तव्यास आहेत अशांची संख्या सुमारे  ४,६६,३०,००० इतकी आहे. हा आकडा २०१५ सालचा आहे.

*चालू घडामोडी आणि स्थलांतराचे चांगले परिणाम...
     
    ‘द बिझनेस इनसाइडर’ नुसार, काही चांगले परिणाम स्थलान्तरामुळे होत असल्याचे दृष्टोत्पत्तीस  आले आहे व युरोपला केंद्रस्थानी ठेवून या परिणामांची चर्चा केली गेली आहे. पहिली महत्वाची बाब म्हणजे युरोपियन युनिअनच्या बजेटमध्ये अल्पकाळासाठी वाढ होईल, ज्याचा आर्थिक परिणाम चांगला होईल. अर्थशास्त्रीय परिभाषेतून युरोपियन युनिअन त्यांच्या विकास कामांवरचा खर्च वाढवेल, ज्यामुळे जरी वित्तीय तुट तयार होणार असली तरी, विकास कामांना चालना मिळेल आणि रोजगार उत्पन्न होतील, तसेच पायाभूत सुविधांसाठी विशेष रक्कम मिळेल, जेणेकरून, पायाभूत सुविधा मिळाल्याने लोकांचे जीवनमान सुधारेल. एकुणातच काय तर, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होईल, उत्पादनात वाढ होईल. आणि नवीन विकासात्मक दृष्टिकोन अंगिकारला जाईल. 



     दुसरी बाब म्हणजे युरोपमध्ये कमी होत चाललेल्या काम करणाऱ्या लोकसंख्येचा प्रश्न निकालात निघेल. याचं उदाहरण द्यायचं झाल्यास एकट्या जर्मनीत २०५० पर्यंत काम करू शकणाऱ्या लोकांची संख्या १,३०,००,००० इतकी घटेल. हे झाले जर्मनीचे. पण युरोपच्या अन्य देशांमध्येही काम करणाऱ्या लोकसंखेच प्रश्न सामावला आहे. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेषन अँड डेव्ह्लप्मेंटच्या एका अह्वालानुसार स्थलांतरित लोकांमुळे युरोपात काम करणाऱ्या लोकांची संख्या मागच्या दहा वर्षात ७०% ने वाढली आहे.

     तिसरी अधोरेखित करण्याजोगी बाब म्हणजे युरोपात असणाऱ्या अति-उजव्या विचारधारेच्या  पक्षांच्या जनमतात घट होईल, त्यांच्या समर्थनात घट होईल. सुरवातीला जरी जनमत हे स्थलांतरितांच्या विरोधी असले तरीसुद्धा त्याचा फारसा परिणाम भविष्यात जाणवणार नाही  असे दिसते. काही महिन्यांपूर्वी घडलेल्या फ्रान्सच्या निवडणुकात हे स्पष्ट झाले. फ्रान्समध्ये अति-उजव्या पक्षाच्या नेत्या मरीन ल पेन आणि मध्यममार्गी पक्षाचे एमॅनुएल मॅक्रोन निवडणुकीच्या रिंगणात होते, पण शेवटी मॅक्रोन यांचाच विजय होऊन ते राष्ट्रपती बनले. 

*स्थलांतराचे नकारात्मक परिणाम...
    
      स्थलांतराचे जरी चांगले परिणाम होत असले तरी त्याचे काही नकारात्मक परिणाम देखील आहेत. युरोपात मुस्लीम बहुल देशांमधून स्थलांतरीत आले आहेत, हे आपण वर पहिलेच. पण एक असा सुद्धा कयास आहे की, ज्या प्रमाणे सामान्य नागरिक युरोपमध्ये आले आहेत, त्या प्रमाणे आयसीस सारख्या दहशतवादी संघटनेचे दहशतवादीसुद्धा आलेत की काय? कारण युरोपमध्ये विविध ठिकाणी जे दहशतवादी हल्ले झाले आहेत आणि होत आहेत, ते बघता असे म्हणण्यास जागा आहे कि स्थलांतरितांमध्ये काही दहशतवादीसुद्धा घुसले असण्याची शक्यता आहे. दहशतवादी हल्ले हे मुस्लीम मुलतत्ववाद्यांनीच केले आहेत, हे सिद्ध झाले आहे.

दहशतवादी हल्ल्यांमुळे निर्माण होणारी स्थलांतरितांच्या विरोधी भावना...
     
     जरी फ्रान्समध्ये अति-उजव्या गटाचा निवडणुकात पराभव झाला असला आणि मध्यममार्गी सरकार आले असले, तरीसुद्धा, युरोपमध्ये स्थलांतरितांच्या विरोधात जनमानस नाही असे मुळीच नाही. इथे एक महत्वाची लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे होऊ घातलेला ब्रीग्झीट! स्थलांतरितांच्या विरोधी जाऊन ब्रिटन मधल्या लोकांनी आम्हाला स्थलांतरित नको असा मुद्दा उपस्थित करून जनमतात त्यांचा विजय होऊन, ब्रिटनवर युरोपियन युनिअन सोडण्याची नामुष्की आली आहे. असा अंदाज आहे कि ब्रीग्झीट २०१९ साली प्रत्यक्षात येईल.

तिसरी महत्वाची बाब म्हणजे स्थलांतरित लोक हे मध्य पूर्वेतून आणि आफ्रिकेतून आले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे कौशल्य नाही म्हणजेच ते अर्ध कुशल कामगार तरी आहेत किंवा त्यांच्याकडे काहीच कौशल्य नाही. मग अश्या परिस्थितीत कसं काय हे लोक, युरोपच्या घटणाऱ्या कामगारांची जागा घेतील, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे, यामुळे अर्थव्यवस्थेवर भार पडेल. जे लोक स्थलांतरितांच्या विरुद्ध आवाज उठवत आहेत त्यांच्या गटानुसार, स्थलांतरितांमुळे, त्या देशांच्या नैसर्गिक साधन संपत्तीच्या वाटपात तसेच अन्न, वस्त्र, निवारा या सारख्या मुलभूत समस्या निर्माण होत आहेत.


*भिन्न संस्कृती कारणीभूत...
     
     अनेक संस्कृती उदयास येऊन त्या मिळून मिसळून राहणे आणि दैनंदिन जीवन पुढे चालू ठेवणे हे अपरिहार्य आहे. हे जणू कोअलीशन सरकार चालवाण्यासारखे आहे, जिथे अनेक पक्ष आहेत, पण सगळ्यांना आपापले वाटे पाहिजेत, सगळ्यांना आपापली प्रगती झाली पाहिजे. स्थलांतर करताना भिन्न संस्कृती असल्यामुळे स्थलांतरित लोकांना ज्या देशात आले आहेत, तिथे सामावून घेणे कठीण होते, हे म्हणण्यास वाव आहे. आम्ही मेहनत करून पैसा मिळवला, आमच्या मेहनतीमुळे आमची प्रगती झाली, आम्ही आमची बुद्धी वापरली, त्यासाठी कौशल्य आत्मसात केली, त्यासाठी आयुष्यातला महत्वाचा वेळ खर्ची घातला, आणि हे सगळे सहज स्थलान्तरीतांना पाहिजे असेल, आणि हे मिळण्याची जर त्यांची क्षमता आणि लायकी नसेल, तर मग विरोध होणे नैसर्गिक आणि साहजिक आहे, असे म्हटले जाऊ शकते. जर दोन संस्कृतींमध्ये फरक असेल, तर त्याचा परिणाम हा विकसित देशांमधील जीवनावर होऊन मग त्यांच्या मध्ये असंतोष निर्माण होऊन जनमानस विकसनशील देशांमधून आलेल्या स्थलांतरितांच्या विरोधी जाते, हे ठिकठिकाणी जगात पहावयास मिळते आहे.

       पाश्चिमात्य देशात आर्थिक सुबत्ता आहे, राहणीमान चांगले आहे, पायाभूत सोई सुविधा चांगल्या आहेत, परत स्वातंत्र्य आहे, म्हणजेच हि त्या देशांची काम करण्याची एक संस्कृती आहे. याउलट विकसनशील देशात पायाभूत सुविधा नाहीतच, लोकांच्या मुलभूत गरजा भागत नाहीत, आर्थिक विषमता आहे, त्यामुळे दारिद्र्य आले आहे. हि त्या त्या देशांची संकृती तयार झाली आहे. काही वेळा आपली संस्कृती बाजूला ठेवून, आपली भाषा, परंपरा बाजूला ठेवून मग स्थलान्तरीतांना वेगवेगळ्या संस्कृतीशी जुळवून घ्यावे लागते. अमेरिकेत एखादा भारतीय असेल तर त्याला त्याची मातृभाषा किंवा हिंदी भाषा बोलून चालत नाही, त्याला इंग्रजीच बोलावी लागते तरच तो तिथे टिकू शकतो, चांगल्या पद्धतीने काम करू शकतो.       फ्रांस आणि जर्मनीतल्या लोकांना त्यांच्या भाषेबद्दल खूप प्रेम आहे, म्हणून त्यांच्या देशात जायचे असेल तर आधी तिथल्या भाषेच जुजबी ज्ञान आत्मसात करणे आवश्यक बनले आहे. आपण जर पाहिलत तर युरोपीय राजकारणी, त्या त्या देशांचे प्रमुख हे त्यांच्या मातृभाषेतच बोलतात, म्हणजे जर्मनीच्या चान्सलर अंजेला मर्केल या इतर देशांच्या राजकारण्याशी जर्मन भाषेतच संवाद साधतात, इतकाच काय तर रशियन फेडरेशनचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन हे पत्रकार परिषदांमध्ये रशीअन भाषेतच बोलतात. इथे संस्कृतीचा मुद्दा उपस्थित होतो. स्थलांतरितांचे जीवनमान सोपे नाही, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा वेगवेगळ्या स्तरांवर मग तो सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल किंवा आर्थिक असेल असा संघर्ष करावा लागतो आणि इतक करून त्यांना परत सामावून घेतले जाईल याची शाश्वती नाही. इथे स्थलांतरितांचे सुद्धा बरोबर आहे आणि ज्या ठिकाणी हे लोक स्थलांतर करणार आहे त्या त्या देशातल्या नागरिकांचे पण काही चुकते आहे असे वाटतं नाही. पण एक मात्र नक्की स्थलांतराच्या मुद्द्यामुळे देशोदेशींचे राजकारण ढवळून निघाले आहे.

      ग्रीस आणि इटलीमध्ये राजकीय संकट उभे राहिले आहे. इटलीने तर जाहीरच करून टाकले कि आता स्थलांतरित आम्हाला नको, त्यासाठी त्यांनी त्यांच्या नौदलाला पाठवून स्थलान्तरीतांना पेट्रोलींगच्यावेळी समुद्रात मधेच रोखुन त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचे आदेश इटालियन सरकारने दिले आहे. भिन्न संस्कृती जर एकत्र नांदू पाहत असतील तर त्यातून स्थालान्तारासारखे प्रश्न निर्माण होऊ शकतात, हि सगळी याची बोलकी उदाहरणे आहेत.            

*सरतेशेवटी...
     
      सिरिया आणि इराक मध्ये आयसीसने घातलेल्या थैमानामुळे लोक तिथून पळाले. येमेन मधेही यादवी चालू आणि सोमालीयासारख्या देशात सुद्धा हीच परिस्थिती. असे जरी म्हटले कि स्थलांतर हे जीवनाचा अविभाज्य भाग आहे, आणि स्थलांतर हे सामाजिक बदलच दर्शवतो, तरीही, जर देशादेशांमध्ये मुलभूत गरजांचे प्रश्न निर्माण होणार असतील तर मग स्थलांतर हवेच कशाला असा प्रश्न पडतो किंवा निर्माण होऊ शकतो. पण स्थलान्तर सुद्धा काही अपरिहार्य कारणांमुळे केले असेल, तर मात्र वेगळी गोष्ट. जग किती वेगाने धावत आहे, आणि किती वेगाने आज आपल्या अवतीभवती बदल होत आहेत, याचेच प्रतिक म्हणजे स्थलांतर होय असे मला वाटते. सगळ्यात ज्यास्त बदल होण्यासारखी गोष्ट म्हणजे तंत्रद्यान. या तंत्रद्यानाच्या बदलण्याच्या वेग मागे टाकून स्थलांतराचा वेग ज्यास्त असेल तर मग हे सगळं अपरिहार्य आहे, न टाळता येण्यासारखे आहे. आपण दहशत्वादाचा बिमोड केला, तसेच मुलभूत आणि पायाभूत सुविधा निर्माण केल्या, त्याच प्रमाणे जर नागरिकांचे राहणीमानात सुधारणा केली, तर आणि तरच स्थलांतराच्या प्रश्नाला लगाम घातला जाऊ शकतो. याचा अर्थ सगळे लोक स्थलांतर करण्याचे थांबवतील असा नाही. पण एका संतुलित, विज्ञानवादी, तांत्रिकदृष्ट्या प्रगत जगाकडे आपण वाटचाल करू यात शंकाच नाही.


-निखील कासखेडीकर

(सदर लेख हा ‘मैत्र’ या यंदाच्या, २०१७ च्या 'स्थलांतर' विषयक दिवाळी विशेषांकात प्रसिद्ध झाला आहे.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

हे आहे ज्ञात इतिहासातलं सगळ्यात कमी काळ चाललेलं युद्ध!

  युद्धाच्या कथा रम्य असतात असं आपण नेहमी म्हणतो आणि ऐकतो. प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि आधुनिक काळ असं आपण जर इतिहासाची काळानुसार विभागणी केली तर आपल्याला आढळेल की अगदी समस्त इतिहासात कुठली एक गोष्ट वारंवार घडत असेल तसंच कुठली एक गोष्ट शाश्वत असेल तर ती आहे युद्ध आणि युद्धच. यावर कोणाचही दुमत होणार नाही... मग तो इतिहास अगदी रोमन असो, ग्रीक असो, चीनचा असो ... थोडक्यात कुठलाही असो, पण याला अपवाद फक्त भारताचा आहे. भारताने स्वतःच्या साम्राज्यविस्तारासाठी कधीही कोणावरही युद्ध लादलं नाही, हे विशेष आहे. साम्राज्यवाढीसाठी, त्याच्या विस्तारासाठी, महत्वाकांक्षेसाठी, अजरामर होण्यासाठी इतिहासात युद्ध लढली गेली... यात एकाचा जय तर दुसऱ्याचा पराजय... अगदी आजच्या काळातलं उदाहरण घ्यायचं म्हणजे रशिया आणि युक्रेनमधलं युद्धं. पुतीन यांचा उद्देश हा साम्राज्यविस्ताराचा आहे, तर यूक्रेनला वाचवण्यासाठी पश्चिमी जग पुढे सरसावलं आहे. तर अशी ही आहे युद्ध लढण्यामागची प्रेरणा. बरं ही युद्ध दीर्घ काळासाठी लढली गेल्याचीही उदाहरण आहेत. आधुनिक जगातलं विसाव्या शतकातलं उदाहरण घ्यायचं झाल्यास पहिलं आणि दुसरं महायुद्ध...

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्...